- खानापूर लाईव्ह न्यूज/प्रतिनिधी:
- खानापूर रूमेवाडी क्रॉस पासून हेमडगा या राज्यमार्गापैकी मनतुर्गा क्रॉस ते रेल्वे गेट पर्यंत रस्त्याची धूळधाण झाली आहे. सदर रस्त्याच्या तात्काळ दुरुस्ती संदर्भात या भागातील शेकडो नागरिकांनी निवेदन देऊन 26 डिसेंबर ला आंदोलनाचा इशारा दिला होता. या निवेदनाची दखल घेऊन खानापूर-हेमाडगा रस्त्याच्या दुरुस्तीला प्रारंभ करण्यात आला आहे. पण, दुरुस्तीच्या नावाखाली डांबरमिश्रित खडी ओतून मलमपट्टी करत धूळपेक करण्याचा प्रकार सुरु असल्याचे निदर्शनास येताच संतप्त लोकांनी मंगळवारी (दि. २६) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच पॅचवर्कचे काम योग्यरीतीने करण्याची सूचना केली.स्थानिक रहिवासी, म. ए. समिती व अन्य संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर खानापूर-हेमाडगा रस्त्याच्यादुरुस्तीला सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला आहे. मात्र, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये डांबरमिश्रित खडी ओतून घिसाडघाईने काम केले जात आहे. नियमाप्रमाणे काम होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते ईश्वर बोबाटे, मऱ्याप्पा पाटील, दत्ता राऊत, अमृत शेलार, प्रल्हाद मादार यांनी मंगळवारी हलात्री पुलाजवळ सुरु असलेल्या दुरुस्ती कामाच्या ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी त्यांना काम सुरु असल्याचे आढळले. केवळ खड्डे भरुन समस्या दूर होणार नाही. काही दिवसानंतर खड्डे पूर्ववत होतील. दहा वर्षे डांबरही न पाहिलेल्या या रस्त्याचेजुजबी दुरुस्ती करुन प्रवाशांच्या डोळ्यात धूळफेक न करता किमान रस्त्याची चाळण झालेल्या ठिकाणी तरी एक पदर डांबरीकरण करण्यात यावे, अशी सूचना त्यांनी ठेकेदार व अधिकाऱ्यांना केली.
- दरम्यान या रस्त्यासाठी केवळ पॅचवर्क साठी किरकोळ निधी असल्याचे प्रारंभी अधिकाऱ्याने सांगितले. पण आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेताच यापैकी बहुतांश रस्ता पूर्ण करण्याची ग्वाही अधिकाऱ्याने दिल्याचे समजते. पण आता प्रत्यक्षात काम कितपत होणार याकडे या भागातील प्रवाशांचे लक्ष लागले आहे. या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होत आहे. या पुलाची उंची वाढविण्यासाठी साडेआठ कोटीचा पुनर्बाधणीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे. हारुरी क्रॉसपासून जागोजागी रस्ता खराब झाला असून या तीन किलोमीटर रस्त्य डांबरीकरणासाठी चार कोटीचा प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती सहायक अभियंते भरमा गुंडेनटी यांनी दिली