IMG-20231213-WA0035

बेळगाव / प्रतिनिधी

  • वडगाव येथील आनंदनगर व साई कॉलनी परिसरात दहशत निर्माण करत चोरट्यांनी तब्बल पाच घरांमध्ये धाडसी चोरी केल्याची खळबळजनक घटना आज बुधवारी पहाटे घडली. या घटनेत चोरट्यांनी डल्ला मारून सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. चोरीच्या या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
  • सर्वप्रथम आनंदनगर पहिला क्रॉस येथे पहाटे ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यान शिवमंदिरासमोरील एका घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करत चोरट्यांनी सुमारे १६ तोळे सोने लंपास केले. घरातील मंडळी पहाटेच्या साखर झोपेत असल्याची संधी साधून चोरट्यांनी डाव साधला. त्यानंतर आनंदनगर दुसरा क्रॉस येथे भाडोत्री घरात राहणाऱ्या रतनकुमार जांगिड यांच्या घरातील चांदीच्या वस्तू व दागिन्यांना हात न लावता चोरट्यांनी फक्त सोन्याचे दागिने लंपास केले. जांगिड कुटुंबिय बाहेरगावी गेले असल्यामुळे गेल्या आठवड्यापासून घर बंद आहे. हीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या बंद घराला लक्ष्य केले.
  • जांगिड कुटुंबिय घरी परतल्यानंतर चोरट्यांनी लंपास केलेल्या दागिन्यांच्या किंमतीचा नेमका आकडा स्पष्ट होणार आहे. जांगिड यांच्या घरी चोरी केल्यानंतर चोरट्यांनी त्याच गल्लीतील संतोष पवार यांच्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र घराच्या दरवाजाला इंटरलॉक सिस्टीम असल्यामुळे चोट्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला. पवार यांच्या घरातील चोरीचा प्रयत्न फसल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या शेजारी असलेल्या अनिल गोकाक यांच्या घराला लक्ष्य केले. गोकाक यांच्या घराचा मागील दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील सोन्याच्या साखळ्या, इयर रिंग्स वगैरे दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. त्यानंतर आनंदनगर साई कॉलनी येथील ज्ञानेश्वर पावशे यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी थेट बेडरूम गाठले. यावेळी पावशे कुटुंबिय गाढ झोपेत असताना कपाटातील सुमारे १४ तोळे सोन्याचे दागिने आणि ४० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. तत्पूर्वी दरवाज्याच्या आवाजाने ज्ञानेश्वर यांच्या आई जाग्या झाल्या. मात्र आरडाओरडा करून मुलाला उठवल्यास चोरटे त्याला इजा करतील या भीतीने त्यांनी स्वतःच एका चोरट्याची कॉलर पकडली. या दरम्यान जाग्या झालेल्या त्यांच्या सुनेने चोर चोर म्हणून आरडाओरड केली. मात्र दोघींनाही धारदार शास्त्राचा धाक दाखवत चोरटे नजीकच्या शेतातून पसार झाले.
  • सदर चोरीच्या प्रकाराची माहिती शहापूर व टिळकवाडी पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास कार्य सुरू केले. घटनेचा पंचनामा करण्याबरोबरच यावेळी ठसे तज्ञ आणि पोलिस श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. पोलिस श्वानपथक घटनास्थळापासून काही अंतरावर जाऊन तेथेच घुटमळले. याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
  • चोरीच्या घटनेबाबत आनंदनगर रहिवासी संघटनेचे अध्यक्ष असलेले संतोष पवार म्हणाले, आमच्या परिसरात एकूण पाच घरांमध्ये चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. यापैकी तीन ठिकाणी ते यशस्वी झाले. परंतु दोन ठिकाणी चोरी करण्यात अपयशी ठरले. चोरट्यांनी माझ्या घराचे दोन दरवाजे देखील तोडण्याचा प्रयत्न केला. घरात आम्ही १० लोक असतानाही चोरट्यांनी हे धाडस दाखवले. तथापि दोन्ही दरवाजांना चांगले कुलूप असल्यामुळे सुदैवाने चोरट्यांना घरात प्रवेश करता आला नाही.
  • घरात लोक असताना देखील चोरटे या पद्धतीने चोऱ्या करत असल्यामुळे आनंदनगर व साई कॉलनीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तेव्हा पोलिस प्रशासनाने आनंदनगर व साई कॉलनीतील रात्रीची गस्त वाढवण्याची विनंती त्यांनी पोलिस प्रशासनाला केली.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us