कर्नाटक : माजी पंतप्रधान एच.डी देवेगौडा यांची सून आणि एच.डी रेवन्ना यांची पत्नी भवानी रेवन्ना यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओ क्लिपमध्ये भवानी रेवन्ना एका दुचाकीस्वारा सोबत गैरवर्तन करताना दिसत आहे. दुचाकी स्वाराने त्यांच्या कारला धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे.
भवानी रेवन्ना व्हिडीओमध्ये दुचाकी स्वाराला त्याच्या कारचं नुकसान झालं म्हणून बसखाली जाऊन जीवे दे असं सांगताना दिसत आहे. इतकंच नाही तर त्या तिथे उपस्थित लोकांवर आपला राग काढताना दिसत आहे. कारची किंमत 1.5 कोटी आहे. कारचं नुकसान आता कोण भरून देईल? असा सवालही विचारला आहे. भवानी रेवन्ना यांनी त्यांच्या दीड कोटी रुपयांची कारचं नुकसान झाल्याचं म्हटलं आहे. तर स्थानिक लोक दुचाकी स्वाराच्या सुरक्षेबाबत चिंतेत आहेत. जेडीएस नेत्या भवानी रेवन्ना यांची कार आणि दुचाकी मध्ये टक्कर झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर भवानी रेवन्ना यांचा चालक मंजुनाथ याने दुचाकी स्वार शिवन्नाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी धडक देणाऱ्या दुचाकी स्वारावर गुन्हा दाखल केला आहे. म्हैसूर जिल्ह्यातील सालिग्राम पोलीस ठाण्यात बाईकस्वाराच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र जोरादार व्हायरल होत असून त्याची चर्चा रंगली आहे.