खानापुर..
- खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
- खानापूर तालुक्यातील मुडेवाडी लोवर प्राथमिक मराठी शाळेचे शिक्षक व एक उत्कृष्ट तबलावादक, संगीत विशारद मष्णू विठोबा चोर्लेकर यांना यावर्षीचा आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आज पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने जिल्हा पंचायत व उपनिर्देशक कार्यालय सार्वजनिक शिक्षण इलाखा बेळगावी कर्नाटक राज्य शिक्षक कल्याण निधी मार्फत गांधी भवन बेळगाव येथे शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला. प्राथमिक गटात दिला जाणारा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार माननीय सतीश जारकिहोळी मंत्री महोदय यांच्या हस्ते मष्णू विठोबा चोर्लेकर यांना देण्यात आला.
- संगीत विशारद, शिक्षक श्री मष्णू विठोबा चोर्लेकर यांचा जन्म विठोबा व रुक्मिणी यांच्या घरी खानापूर तालुक्यातील मणतुर्गे येथे झाला. अथक परिश्रमातून शिक्षण घेऊन सन 1999 साली सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा कुपटगिरी येथे शिक्षकीपेशात रुजू झाले.. गेल्या चोवीस वर्षांत पवित्र अशा शिक्षकी पेशात त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रभावी ठरले.विद्यार्थी प्रिय व शिस्तीचे भोक्ते असून समाजाशी नाळ उत्तम प्रकारे जोडलेली आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यास अधिक लक्ष देवून अनेक विद्यार्थी उच्च पदावर आहेत त्यानंतर सरकारी लोअर प्राथमिक मराठी शाळा मुडेवाडी येथे सध्या कार्यरत आहेत. या ठिकाणी शालेय वातावरण निर्मिती करण्यात हातखंडा आहे. गावातील पंचमंडळी व दानशूर व्यक्तींना विश्वासात घेऊन शाळेची दोन गुंठे जागा नोंद करून घेतली त्यानंतर शालेय सजावट व संरक्षण भिंत बांधून सुसज्ज असे शाळेचे स्वरूप त्या ठिकाणी निर्माण केले याची पोचपावती म्हणून तात्कालीन बीईओ हळंगळी साहेब यांनी शाळा आदर्श शिक्षक पुरस्कार बहाल केला होता. त्यानंतर अनेक सरकारी योजना यशस्वीरित्या राबविल्या. गावातील दानशूर व्यक्तींच्याकडून शालेय प्रवेशद्वार शालेय गेट प्रोजेक्टर प्रिंटर अशा अनेक लहान मोठ्या वस्तू देणगी दाखल करून शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावला. अभ्यासाबरोबरच संगीत विषयाचे सुद्धा विद्यार्थ्यांना ज्ञान देत असतात तालुक्यातील अनेक शाळा कॉलेजच्या या ठिकाणी कार्यक्रमात तबला साथीसाठी योगदान देतात.भजन किर्तनाला साथ लाभते.जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत यश संपादन केलेलें आहे.
- दिल्ली येथे जागतिक सांस्कृतिक महोत्सवात सहभाग दर्शवून खानापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व केले. शालेय विद्यार्थ्यांना प्रतिभा कारंजी स्पर्धेत जिल्हा पातळीवर घेऊन जाण्यात अनेक वेळा यश आलेले आहे. कलिका हब्ब सारख्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचे सुप्त गुण बाहेर काढण्यासाठी निरंतर प्रयत्न असतात.याव्यतिरिक्त शालेय वेळे नंतर आपल्या फावल्या वेळेचा सदुपयोग करून घेऊन भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाकडून संगीत विशारद ही पदवी प्राप्त केलेली आहे.
- त्याचप्रमाणे सावित्रीबाई पुरस्कार देण्यात आलेला आहे. कन्नड साहित्य परिषतू तालुका घटक खानापूर यांच्यावतीने लोंढा व खानापूर या ठिकाणी झालेल्या कन्नड साहित्य संमेलनामध्ये गौरविण्यात आलेले आहे . शालेय कर्तव्यात कोणताही कसूर न करता समाजाशी आपुलकीची नाळ बांधिलकी संगीत भजनाद्वारे उत्तम प्रकारे जोडलेली आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये व तालुका स्पर्धा भरविण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावतात. मुळातच नाट्य कलाकार असल्यामुळे विद्यार्थ्यांना नाट्यीकरणाने शिकविण्यात यांचा हातखंड आहे. खानापूर तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीत संचालक पदाद्वारे खारीचा वाटा उचलण्याचे काम केलेले आहे. म्हणूनच आज 5 सप्टेंबर 2023 या शिक्षक दिनी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. यामुळे त्यांचे सगळीकडे कौतुक होत आहे.