खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
खानापूर तालुक्यात गेल्या 2023 च्या एसएसएलसी परीक्षेमध्ये विशेष गुणवत्तेत पास झालेल्या गरीब होतकरू व अनाथ विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ येत्या सोमवार दि. 28 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. खानापूर येथील शिवस्मारक ट्रस्टच्या वतीने या गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले असून येथील राजा शिवछत्रपती स्मारक माजी आमदार व्हि. वाय चव्हाण सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवस्मारक ट्रस्ट समितीचे अध्यक्ष एम. पी. पाटील राहणार असून मुख्य अतिथी म्हणून आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार दिगंबर पाटील यांना निमंत्रित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आरपीडी कॉलेजच्या निवृत्त प्राध्यापिका सौ. संध्या देशपांडे यांना निमंत्रित करण्यात आले असून तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या पाल्यांचा गौरव समारंभात सहभागी व्हावे असे आवाहन शिव स्मारक ट्रस्ट समितीच्या वतीने करण्यात आले आहे.