फोटो : खानापूर : दीपप्रज्वलन करताना माजी आमदार अरविंद पाटील, मल्लिकार्जुन के. आर, बसवराज रामन्नवर, लक्ष्मीनारायण भट व इतर.
खानापूर लाईव्ह न्युज / प्रतिनिधी
छायाचित्रकारांनी नवे बदल आणि तंत्रज्ञान आत्मसात करत मार्गक्रमण करणे आवश्यक आहे. स्मार्टफोनच्या जमान्यातही छायाचित्रण कलेचे महत्त्व अबाधित आहे. या व्यवसायाला कमी न लेखता कलेचा अभिमान बाळगल्यास चरितार्थासह मानसन्मानही मिळवता येऊ शकतो. असे प्रतिपादन माजी आमदार अरविंद पाटील यांनी केले खानापूर तालुका फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर संघटनेच्या वतीने शिवस्मारक येथे झालेल्या जागतिक छायाचित्र दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी शिवा बागवाडकर होते प्रमुख पाहुणे म्हणून राज्य संघटनेचे संचालक मल्लिकार्जुन के. आर. म्हणाले, केवळ छंद म्हणून या व्यवसायाकडे न वळता व्यवसायिक कौशल्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. भूतकाळ जतन करून ठेवण्याचे सामर्थ्य छायाचित्रण कलेमध्ये असून आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन नवीन प्रयोगांना छायाचित्रकारांनी वाहून घ्यावे असे आवाहन केले. लक्ष्मीनारायण भट यांनी छायाचित्रकारांची राज्य संघटना सदैव आपल्या पाठीशी असून सदस्यांच्या हितासाठी संघटनेचा विस्तार वाढवण्याची सूचना केली.
पत्रकार वासुदेव चौगुले म्हणाले, हजार शब्दांचे सामर्थ्य एका चित्रामध्ये सामावलेले असते. कोणतेही छायाचित्र अधिक दर्जेदार आणि कलात्मक नजरेने टिपण्यासाठी योग्य अँगल महत्त्वाचा असून निरीक्षण आणि अभ्यासातून हे शास्त्रशुद्ध तंत्र आत्मसात करायला हवे. ग्राहकांनी छायाचित्रकारांना त्यांच्या सेवेचा वेळेत मोबदला दिल्यास त्यांच्या परिश्रमाचे चीज झाल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी लक्ष्मण यमकनमर्डी, डी. बी. पाटील, रवी काडगी, दीपक गुरव, पोलीस उपनिरीक्षक गिरीश, सुरेश जिनराळ, गुरुप्रसाद चिंचणीकर, चांगदेव अल्लोळकर, संजय मांजरेकर, दत्ता गावडे, शिरीष बिरजे, वैभव चव्हाण, ज्ञानेश्वर पाटील, विलास पाटील, रमेश उरुणकर, मयूर पाटील आदी उपस्थित होते. संजय करंबळकर यांनी आभार मानले.