खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
- पणजी : डोंगरी-तिसवाडी येथे स्मशानभूमीच्या जमिनीच्या वादातून संशयित पीटर जांसित वाझ याने अंत्यविधीसाठी आलेल्या कुटुंबीयांवर गोळीबार केला. या गोळीबारात मयत गणपत वेंगुर्लेकर यांचा भाऊ सुदैवाने बचावला. पोलिसांनी संशयित पीटर जासिंत वाझ याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडील पिस्तुलही जप्त केले आहे. याप्रकरणी तक्रार नोंदवून पुढील तपास केला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, डोंगरी-तिसवाडी परिसरात राहणाऱ्या गणपत वेंगुर्लेकर नामक व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून अंत्यविधीसाठी डोंगरी येथील स्मशानभूमीत साफसफाई सुरू होती. त्याचवेळी संशयित पीटर वाझ हा त्याठिकाणी आला. संशयिताने साफसफाई करणाऱ्या वेंगुर्लेकर कुटुंबाला रोखत वाद घालण्यास सुरुवात केली. या स्मशानभूमीत अनेक वर्षे अंत्यविधी केले जात असल्याने वेंगुर्लेकर यांनीही स्मशानभूमी अंत्यविधी करण्यासाठी आल्याचे सांगितले. पीटरने वेंगुर्लेकर कुटुंबीयांशी शाब्दिक वाद घालत असतानाच त्यांच्यावर पिस्तुल रोखले. वाद सुरू राहिल्याने पीटरने पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी ज्याच्या अंत्यविधीसाठी आलेले होते, त्या मयत गणपत यांच्या भावाच्या बाजूने गेली. या गोळीबारात ते सुदैवाने बचावले. या घटनेची माहिती मिळताच आगशी पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामा करत संशयित पीटर वाझ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिस्तुलही जप्त केली. पुढील तपास आगशी पोलीस करत आहेत.