खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : ता. १० : खानापूर तालुक्यातील अनेक मराठी शाळांच्या इमारतींची पडझड झाली आहे. त्यामुळे विद्यार्थांना त्रास सहन करावा लागत असल्याने त्यामुळे शाळा इमारतींच्या दुरुस्तीसाठी तातडीने अनुदान उपलब्ध करून द्यावे अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आली आहे. तालुका समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पावसाने नुकसान झालेल्या विवीध शाळांची पाहणी केली तसेच शाळांच्या विकासासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, बेळगाव महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, राजू कदम, आनंद पाटील आदींनी तालुक्यातील विवीध शाळांना भेट दिली. यावेळी अनेक शाळांमध्ये गळती लागल्याचे दिसून आले असून तालुक्यातील अनेक गावांमध्ये तातडीने शाळा दुरुस्तीचे काम हाती घेणे गरजेचे आहे.
खानापूर तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे दरवर्षी विविध भागातील शाळांना दुरुस्तीच्या कामासाठी अधिक प्रमाणात निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शाळेत पाणी गळती होत असल्याची माहिती अनेक शिक्षकांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याचे कारण देत शिक्षण खात्याकडून दरवर्षी शाळांना कमी प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात आहे. मात्र प्रत्येक शाळेमध्ये कमी जास्त प्रमाणात विद्यार्थी असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी शिक्षण खात्याने घेऊन शाळांच्या दुरुस्तीसाठी तातडीने मदत करावी यासाठी तालुक्यातील ज्या शाळांचे नुकसान झाले आहे त्या शाळांची माहिती घेऊन गट शिक्षणाधिकारी कार्यालयाला निवेदन दिले जाईल अशी माहिती यावेळी समिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
मराठी शाळांच्या उन्नतीसाठी समिती घेणार पुढाकार…
खानापूर तालुक्यातील ज्यादा तर शाळा दुर्गम भागात आहेत. त्यामुळे या शाळांच्या विकासासाठी सातत्याने निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मात्र प्रशासनाकडून सातत्याने मराठी शाळांना सापत्न भावाची वागणूक दिली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समिती स्वतः पुढाकार घेऊन शाळांच्या विकासासाठी पुढाकार येणार आहे. त्यामुळे विविध शाळांच्या समस्यांबाबत शाळा सुधारणा कमिटीने संपर्क साधावा असे आवाहन देखिल समितीतर्फे करण्यात आले आहे.