खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी :
अंगणवाडी शिक्षिका भरती प्रक्रियेत मराठी भाषिक असलेल्या तृतीय भाषेवर अन्याय केला जात निवड प्रक्रिया ही प्रथम भाषेची अट न घालता तृतीय भाषेतीलही उमेदवारांना समाविष्ट करून घेण्यात यावी अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने राज्य महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांची भेट घेऊन एक निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की,अल्पभाषिक आयोगाच्या निर्देशनानुसार मातृभाषेतूनच शिक्षणाचा अधिकार असल्याने अंगणवाडीत मातृभाषेतून शिक्षण दिले जाणे गरजेचे आहे. ज्यांची मातृभाषा मराठी आहे त्यांना त्या बालकांना कन्नड मधून शिक्षण दिल्यास बालमनावर परिणाम होऊन कोणत्याच भाषेचे आकलन होणार नाही त्यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार आहे. यासाठी मंत्रिमंडळाने तातडीने ही अट रद्द करावी, अशी मागणी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, हा निर्णय राज्यस्तरीय घेतला गेला आहे. मात्र बेळगाव जिल्हा हा बहुभाषिक मराठी असल्याकारणाने या ठिकाणी निश्चितच मराठी भाषिकाला प्राधान्य दिले जाईल त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आपण कोणावरही अन्याय होऊ देणार नाही असे आश्रासन यावेळी दिले. यावेळी समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबर पाटील, आबासाहेब दळवी, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, उपाध्यक्ष रमेश धबाले, राजाराम देसाई, आधी उपस्थित होते. यावेळी शैक्षणिक समस्या संदर्भात जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले.