बेळगाव:
मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने उचललेला खारीचा वाटा विद्यार्थ्यांना पुढील काळात महत्त्वाचा ठरेल असे प्रतिपादन माजी तालुका पंचायत सदस्य चंद्रकांत देसाई यांनी केले आहे.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने गुरुवारी हलशीवाडी, नरसेवाडी आदि शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. प्रारंभी हलशीवाडी येथील सरकारी मराठी शाळेचे मुख्याध्यापक के एस जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. चंद्रकांत देसाई, माजी ग्राम पंचायत सदस्य अर्जुन देसाई, गणपत देसाई, आदिंच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत देसाई यांनी खानापूर तालुक्यातील मराठी शाळांवर कर्नाटक सरकारची वक्रदृष्टी पडत आहे. त्यामुळे पालकांची जबाबदारी वाढली असून प्रत्येकाने आपल्या पाल्याला मराठी शाळेत पाठवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले पाहिजे. युवा समितीतर्फे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले जात आहे. त्याची दखल घेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी युवा समितीच्या कार्याला मदत करावी आणि पुन्हा एकदा खानापूर तालुक्यातील मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत. महाराष्ट्र एकीकरण समिती सातत्याने मराठी भाषा आणि संस्कृती टिकविण्यासाठी कार्य करीत आहे त्याला येणाऱ्या काळात नक्कीच यश मिळेल असे मत व्यक्त केले.
मिलिंद देसाई यांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेली विद्यार्थी आज अनेक क्षेत्रात अग्रेसर आहेत. त्यामुळे इतर माध्यमातून शिक्षण घेतले तरच विकास होतो किंवा नोकरी मिळते हा संभ्रम दूर करणे आवश्यक आहे. काही वर्षांपूर्वी हल्ल्याळ, सुपा, जोयडा आदी भागात मराठी शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. परंतु त्या भागातील शाळा बंद करण्यात कर्नाटक सरकार यशस्वी ठरले परंतु मराठी भाषिकांनी जबाबदारी घेत या भागातील शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे मत व्यक्त केले. प्रभाकर देसाई, अर्जुन देसाई यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.
शाळा सुधारणा कमिटीचे विनायक देसाई, अनिल देसाई, नर्शिंग देसाई, मल्लाप्पा देसाई यांच्या सह पालक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.