खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
खानापूर तालुका मराठी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचा १२ वा वर्धापन दिन सोमवार दि. ३१ जुलै रोजी श्री ज्ञानेश्वर मंदिर सभागृहात सकाळी ११ वाजता संपन्न झाला. अध्यक्षस्थानी मराठी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डी. एम. भोसले गुरूजी होते. प्रमुख अतिथी म्हणून खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष व्ही. एम. बनोशी, राष्ट्रपती आदर्श शिक्षक व खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी, मराठी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष व्ही. यु. देसाई गुरूजी, सचिव ए. एम. पाटील गुरूजी, एम. पी. पाटील अध्यक्ष राजा शिवछत्रपती स्मारक ट्रस्ट आणि बी. बी. पाटील सर हे उपस्थित होते. यावेळी खानापूर तालुक्याचे नुतन आमदार विठ्ठलराव सोमाण्णा हलगेकर यांचा संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर यांनी मराठी सेवानिवृत्त शिक्षण संघटनेच्या ज्येष्ठ शिक्षकांनी संघटनात्मक हाती घेतलेले कार्य हे अत्यंत कुशल व अभिनंदननास्पद प्रत्येक व्यक्तीच्या उत्तरार्धात मित्रत्वाची साथ व संघटनेची बांधिलकी जपणारी ही संघटना अशीच कार्यतत्व राहो व समाजातल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व ज्येष्ठांचा सन्मान करण्याची ताकद या संघटनेतील जेष्ठा नाही लाभावी व त्यांना सुख समृद्धी व शतावरी लाभावे अशी सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
84 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ शिक्षकांचा सहस्त्रचंद्रदर्शन पुरस्काराने सन्मान
यावेळी मराठी सेवानिवृत्त शिक्षक सभासद ज्यांनी वयाची ८४ वर्षे पुर्ण केलेत, त्या शिक्षकांचा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा म्हणून शाल, श्रीफळ, पुष्पहार व भेटवस्तू देऊन खालील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ शिक्षक मल्लाप्पा गणेश शिंदे, किरहलशी, गणपती विठ्ठल पाटील, शिवोलि, महादेव लक्ष्मण पाटील, म्हाळुंगे, मारूती व्यंकटेश हुंदरे, सन्नहोसूर, सातेरी चाळोबा पाटील, बेकवाड, गोपाळ कृष्णाजी पवार, कारलगा, राजाराम लक्ष्मण पाटील, चन्नेवाडी, गोपाळ लक्ष्मण हेब्बाळकर, तिवोली, भिकाजी कृष्णाजी पाटील, नरसेवाडी, देवाप्पा उमाजी पाटील, नरसेवाडी तसेच हेब्बाळ गावचे वयोवृद्ध ज्येष्ठ शिक्षक उमाना शंकर गुरव (वय ९६ वर्षे) आणि करंबळचे देवाप्पा भरमाणा घाडी (वय ९२ वर्षे) यांचा सत्कार करण्यात आला.
विशेष म्हणजे या सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या वतीने जे वयस्कर आहेत आणि ज्यांना कार्यक्रमास्थळापर्यंत येऊन सत्कार स्वीकारणे शक्य नाही. अशा जेष्ठ गुरुजनांचा सन्मान त्यांच्या त्यांच्या गावी जाऊन त्यांच्या कुटुंबिया समवेत करण्यात करण्यात आला. हे या संघटनेचे विशेष कार्य म्हणावे लागेल.
त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये कुप्पटगिरी गावची कन्या कु. संचिता दशरथ पाटील हिने ९६.९६% गुण मिळवत मराठी विभागामध्ये कर्नाटक राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. खानापूर तालुका मराठी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे सभासद संभाजी बाबाजी पाटील गुरूजी कुप्पटगिरी यांची नात कु. सोनाली ज्ञानेश्वर पाटील नागुर्डे हिने ९८.४०% गुण मिळवत इंग्रजी माध्यमातून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला, तसेच एम पी कदम गुरूजी निडगल यांची नात कु हर्षल सुनील पाटील हिने ९४.६०% गुण मिळवले आहे. या सर्व गुणी विद्यार्थिनींचा रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन. एम. पाटील गुरूजींनी केले, अहवाल वाचन ए. एम. पाटील गुरूजींनी केले. यावेळी सत्कारमूर्ती तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर, जी. एल. हेब्बाळकर गुरूजी, दे. भ. घाडी गुरूजी त्याचप्रमाणे गुणी विद्यार्थीनी कु सोनाली पाटील व कु संचिता पाटील यांनी सत्कारा दाखल मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रमुख अतिथी व्ही. एम. बनोशी, आबासाहेब दळवी, बी बी पाटील आणि समारंभाचे अध्यक्ष डी एम भोसले गुरूजींनी वर्धापन दिन व सहस्त्र चंद्र दर्शन सत्कारमूर्ती व गुणी विद्यार्थिनींच्या बाबत विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार संभाजी बाबाजी पाटील गुरूजी यांनी केले. यावेळी निवृत्त मराठी शिक्षक संघटनेचे सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.