खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: (प्रा अरविंद पाटील याजकडून)
जीवनाच्या प्रत्येक वळणावर आज मुलींच्याच कर्तृत्वाचा बोलबाला आहे. एकवीसाव्या शतकाच्या संगणकीय क्षितिजावर ‘स्व’प्रतिभेने चमकणाऱ्या मुली आपल्या कर्तृत्वाची मोहर प्रत्येक उमटवताना अथक प्रयत्नांची मिसाल पेश करताहेत….. खरंतर घरी मुलगी जन्माला येणं म्हणजे आईवडीलांच्या संकटात वाढ होणं असंच काहीसं पण हे विधान आता मुली लिलया खोडून काढून मुलगी जन्माला येणं म्हणजे सर्वस्व निर्माण करणं याची प्रचिती देताना दिसत आहेत.
याचेच उत्तम उदाहरण म्हणजे बेळगाव येथील मराठा मंडळाचे कार्यालयीन व्यवस्थापक श्रीयुत व्ही एल मन्नुरकर यांची कन्या कुमारी स्नेहल ही आहे.
बेळगावच्या मराठा मंडळ इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आपल्या ज्ञानाचा श्रीगणेश करणाऱ्या या कन्नेने आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण करतानाचा दहावीच्या बोर्ड परीक्षेत आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली होती. नंतर आर एल एस काॅलेजमधून बारावी विज्ञान शाखेत उत्तम गुणवत्तेसह उत्तीर्ण होत नीट परीक्षेत आपलं कौशल्य दाखवून वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करण्याचा आपला बुलंद इरादा जाहीर केला व राजर्षी छत्रपती शाहू महाराज गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर येथून एम बी बी एस ही पदवी संपादन केली. अनंत अशी ध्येयासक्ती सोबत घेऊन, उच्च विद्याभूषित व्हायचे स्वप्नं बाळगून, सतत त्याचा पाठपुरावा करणाऱ्या डाॅक्टर स्नेहल यांनी एम. एस् साठी असणारी कठीण अशी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन श्री भाऊसाहेब हिरे गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेज धुळे येथे पदवीत्तर शिक्षणासाठी रूजू झाली.
म्हणतात ना….. रत्नहाराचे तेज कोणाला समजावून सांगावे लागत नाही आणि रातराणीच्या सुगंधाची कोणी चर्चा करीत बसत नाही अगदी असंच डाॅक्टर स्नेहल यांच्या प्रतिभेचे झालं आहे.
जून 2023 मध्ये घेण्यात आलेल्या एम एस जनरल सर्जरीच्या महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक येथून अंतिम वर्षाच्या परीक्षेत तब्बल 65 टक्के (तेही पदवीत्तर वैद्यकीय शिक्षणात) गुण घेऊन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन बेळगावकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा गोवला आहे. बेळगावात अशा जेमतेम दोन चार महिला सर्जन आहेत. त्यात डॉ स्नेहल एक आहेत ही मराठा समाजासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे .
तत्पूर्वी डॉ स्नेहल मन्नुरकर यांनी जीवाची बाजी करून कोरोना काळात पहिल्या लाटेत कोल्हापूर – पन्हाळा येथे व दुसऱ्या लाटेत धुळे येथील जिल्हा रूग्णालयात आपले वैद्यकीय कौशल्य पणाला लावून हजारो लोकांचे जीव वाचवत कोरोना योध्दा म्हणून स्मरणीय कार्य केले आहे.
सर्जरी क्षेत्रात पुरूषांचा दबदबा असतो हे जरी खरं असलं तरी डॉक्टर स्नेहल मन्नुरकर यानी इथे मारलेली मुसंडी वैद्यकीय क्षेत्रात एक वेगळा आयाम निर्माण करणारी आहे.वैद्यकीय क्षेत्राच्या आकाशाला गवसणी घालणाऱ्या डाॅक्टर स्नेहल यांचं पुढचं ध्येय एम सी एच करायचं असून त्या आता नीट एस एस २०२३ सारख्या खडतर परीक्षेची कसून तयारी करीत आहेत…. म्हणून डाॅक्टर स्नेहल लक्ष्मण मन्नूरकर यांचे विशेष अभिनंदन होत आहे!