खानापूर लाईव्ह न्यूज : प्रतिनिधी
दावणगिरी व हुबळी जिल्ह्यात डोळ्यांची साथ (मद्रास आय) मोठ्या प्रमाणात असून बेळगाव फैलावत जिल्ह्यातही डोळ्याच्या साथीने डोळे उघडले आहेत. खानापूर तालुक्याच्या जांबोटी कणकुंबीसह खानापूर पट्ट्यातील अनेक भागात या साथीच्या रोगाचे थैमान फैलावत आहे. यासाठी नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन खानापूर तालुका वैध्याधिकारी संजय नांद्रे यांनी यांनी केले आहे.
डोळ्याची साथ ही अनेक वेळा त्रासदायक ठरते. डोळा हा शरीराचा एक अविभाज्य घटक असल्याने त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. मद्रास नेत्र हा एक संसर्ग असून हवामान बदलामुळे पसरतो. नेत्र संसर्गामुळे डोळ्याला लालसरपणा, सूज आणि खाजही असते. पापण्या चिकटत असतात. मुलांना तापही येऊ शकतो. बाधित तीन ते चार दिवसांत बरे होतात. डोळे स्वच्छ कपड्याने पुसावेत. डोळे चोळू नयेत. कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर टाळावा. संसर्ग झाल्यास घरगुती उपचार टाळण्याचा सल्ला त्यांनी दिला. कोणतेही ड्रॉप्स वापरण्यापूर्वी नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. साबणाने वारंवार हात धुणे आणि सॅनिटायझर लावणे हे चांगले उपाय आहेत. सौदत्ती आणि गोकाक तालुक्यात अधिक रुग्ण आढळत आहेत, आता खानापूर तालुक्यातही त्याची हळुवारपणे लागण होताना दिसतेय असे त्यांनी सांगितले
.
मद्रास आय नावाच्या डोळ्यांचा आजार आता पसरू लागला आहे. सर्वत्र पावसाने थैमान घातले आहे. यातच आता अचानक डोळे चुरचुरणे, डोळे लाल होणे, यातून पाणी वाहणे, पु येणे, ताप येणे या प्रकारे लक्षणे दिसून येत असतील तर ही मद्रास आय आजाराची लक्षणे समजावित. पावसाळ्यात हा आजार बळावतो. मात्र हा आजार संसर्ज नसून याला घाबरण्याची गरज नाही. परंतु हि लागण होऊ नये म्हणून खबरदारी घेणे हितकारक ठरेल. असे आरोग्याधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
हळू हळू आता सगळीकडे मद्रास आय ची लागण झाल्याचे वृत समोर येत असून, जनतेनी यापासून सुरक्षित राहण्यासाठी स्वतः कडे सदैव रुमाल बाळगावा, रुग्णाचे अंथरूण, कपडे, टॉवेल नेहमी स्वच्छ ठेवावेत. नेहमी गरम पाण्याने हात पाय धुवावे, गरम पाण्यानी नियमित आंघोळ करावी. वैद्यांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावे. मद्रास आय ची लागण झालेल्या मुलांना शाळेत पाठवू नये. ज्यांना अशा प्रकारची लक्षणे जाणवत असतील त्यांनी त्वरित तज्ञ डॉक्टराकडून आपले उपचार करून घ्यावेत असे आवाहन वैद्याधिकाऱ्यांनी केले आहे.