खानापूर : तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांमधील रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या 49 आणि मदतनिसांच्या 84 जागा भरण्यात येणार आहेत. पण या पदांसाठी अर्ज करणाऱ्यांना दहावीत कन्नड हा प्रथम अथवा द्वितीय विषय असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे मराठी भागातील मराठी भाषिक महिला उमेदवारांवर अन्याय होणार आहे. याबाबत विचारविनिमय करून कायदेशीर दाद मागणे आवश्यक आहे. त्याकरिता चर्चा करण्यासाठी गुरुवार दि. 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजता खानापूर स्टेशन रोडवरील लक्ष्मी मंदिरात बैठक बोलावण्यात आली आहे.
मराठी माध्यमातून शिकलेल्या ज्या महिला उमेदवारांनी अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस या पदासाठी अर्ज भरले आहेत अशा उमेदवारांनी गुरुवारी सकाळी 11 वाजता लक्ष्मी मंदिरातील बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर यांनी केले आहे.