खानापूर /प्रतिनिधी : बेळगाव -पणजी राष्ट्रीय महामार्गावरील गणेबैल नजिक टोल सुरू करण्यास पुन्हा एकदा संबंधित प्रोजेक्ट अधिकाऱ्यांनी ताकद पणाला लावली आहे. टोल सुरू करण्यास आक्षेप घेतलेल्या शेतकऱ्यांची मागणी डावलून शनिवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात टोल सुरू करण्याचा प्रयत्न महामार्ग प्रोजेक्ट अधिकाऱ्यांनी अवलंबिला आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पुन्हा एकदा आंदोलन करून टोल बंद पाडण्याचा प्रयत्न सुरू केला.
बेळगाव -पणजी राष्ट्रीय महामार्गापैकी केवळ खानापूर- बेळगाव या महामार्गावरील 16.2 किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. पण उर्वरित रस्ता काम अर्धवट असताना तसेच भूसंपादित केलेल्या शेतकऱ्यांना न्याय न देताच टोल सुरू करण्यात येत असल्याने जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी जोरदार आक्षेप नोंदवला आहे. प्रथमतः जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी. त्यानंतरच टोल सुरू करण्यात यावा अशी मागणी रेटून धरली आहे. तीन-चार दिवस प्रोजेक्ट अधिकाऱ्यानी आपल्या कर्मचाऱ्यांना तैनात करून टोल प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रयत्न केले, पण भाजपच्या नेत्यांनी व होनकल, करंबळ, हलकर्णी, खानापूर ,गणेबैल भागातील शेतकऱ्यांनी टोल सुरू करण्यास कायम विरोध दर्शवला आहे
शुक्रवारी देखील प्रोजेक्ट अधिकाऱ्यांचा एक ताफा टोल सुरू करण्यासाठी गनेबैल टोल नाक्याजवळ थांबला असताना भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप अध्यक्ष संजय कुबल आदींनी त्यांना धारेवर धरले. व शेतकऱ्यांच्या समस्या दूर करा, नंतर टोल सुरू करा, आमची कोणतीच अडचण नसल्याचे सांगितले होते. परंतु पुन्हा शनिवारी सकाळी प्रोजेक्ट अधिकाऱ्यांनी टोल प्रक्रिया सुरू पोलिसांची फौज घेऊन सुरू करण्याचा आटापिटा सुरू केला आहे. बेळगाव खानापूर या महामार्गाचे काम पूर्ण होऊन वर्ष उलटले त्यामुळे उर्वरित कामासाठी आम्हा कंपनीला नुकसान होत असून पूर्ण झालेल्या रस्त्याच्या आकारणीनुसार टोल प्रक्रिया हाती घेणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सहकार्य केले नाही तर शासनावरही याचा दंड पडू शकतो. यामुळे प्रशासनालाही प्रोजेक्ट अधिकाऱ्यांना समर्थन करावे लागत आहे. पण इकडे शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई तसेच अर्धवट रस्त्या संदर्भात मात्र पूरक उत्तर देण्यास प्रशासकीय अधिकारी काम चुकारपणा करत आहेत. एक तर शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई त्वरित पूर्तता करा व त्यानंतरच टोल सुरू करा असा आग्रह शेतकऱ्यांनी धरला आहे.
दरम्यान बेळगावचे प्रांताधिकारी यांनी या टोल नाक्याच्या ठिकाणी हजर होऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतले आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गात गेल्या आहेत .अशा बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. पण शेतकरी म्हणतात आपल्याला पैसे जमा झाले नाहीत. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर महामार्ग प्राधिकरणाचे नाव पडले आहे. पण प्रत्यक्षात कोणालाही नुकसान भरपाई मिळाली नाही. याबद्दल आक्षेप नोंदवला यानुसार प्रांताधिकारी यांनी महामार्गाच्या लगत असलेल्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्याची पाहणी सुरू केली आहे.