खानापूर ता. पं. चे माजी सभापती रामचंद्र चौगुले यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आदरांजली
खानापूर :
खानापूर तालुका पंचायतीचे माजी सभापती रामचंद्र चौगुले यांनी निस्वार्थपणे समाजाची सेवा केली. तालुक्याच्या सहकार, राजकारण आणि समाजसेवेचा अध्याय त्यांच्या नावाशिवाय अपूर्ण राहील. त्यांचे योगदान तालुका कधीही विसरणार नाही अशा शब्दात माजी आमदार व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.
हलकर्णी (ता. खानापूर) येथील प्रतिष्ठित नागरिक आणि खानापूर तालुका पंचायतीचे माजी सभापती रामचंद्र गुंडूराव चौगुले (वय 75) यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी आठच्या सुमारास निधन झाले. दुपारी 2 वाजता हलकर्णी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी श्रद्धांजली वाहताना वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड आय आर घाडी म्हणाले, पदरमोड करून समाजसेवा करणारी माणसे आज दुर्मिळ झाली आहेत. रामचंद्र चौगुले यांनी गावाच्या विकासासाठी स्वतःच्या जमिनी दिल्या. गोरगरीब जनतेची सेवा करताना त्यांनी कशाचीही अपेक्षा बाळगली नाही. मनमिळाऊ व्यक्तिमत्व आणि दातृत्वसंपन्न स्वभाव यामुळे त्यांच्या घरी काम घेऊन आलेला एकही माणूस निराश होऊन परत गेला नाही. गांधीनगर हलकर्णी येथील श्री गजानन पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन, हलकर्णी प्राथमिक कृषी पत्तीन संघाचे संस्थापक चेअरमन तसेच हलकर्णी ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष होते. हलकर्णी ग्रा. पं. अस्तित्वात येण्यापूर्वी रामगुरवाडी ग्रा. पं. चे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले होते. त्यानंतर हलकर्णी ग्रा. पं. वर सलग 25 वर्षे त्यांनी आपली सत्ता राखली. माजी आमदार दिगंबर पाटील, म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, प्रकाश चव्हाण, यशवंत बिर्जे, वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड आय. आर. घाडी, मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर, भाजप अध्यक्ष संजय कुबल, खानापूर विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील, खानापूर अर्बन बँकेचे चेअरमन अमृत शेलार, संचालक मेघशाम घाडी, माजी ता पं सदस्य महादेव घाडी, पी. एच. पाटील, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, पंडित ओगले, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पिराजी कुराडे, ग्रामपंचायत अध्यक्ष प्रवीण आगनोजी आदींनी अंत्यदर्शन घेऊन शोक व्यक्त केला.