खानापूर/ प्रतिनिधी; बेळगाव पणजी व्हाया अनमोड या राष्ट्रीय महामार्गापैकी बेळगाव• खानापूर पासून गोवा सरहद्दीपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या 2011 पासून कार्यान्वित झाले आहे. पण या या नोटिफिकेशन ला बारा वर्षे झाली. तरीही राष्ट्रीय महामार्गाचे बहुतांश काम आजही अर्धवट अवस्थेमध्ये आहे, असे असताना खानापूर बेळगाव महामार्गावरील गणेबैल नजीकच्या टोलनाक्यावर वाहन कर वसुली करण्याची प्रक्रिया संबंधित कंपनीने हाती घेतले असून येत्या 11 जुलैपासून वाहन कर वसुलीला प्रारंभ होणार आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम अर्धवट असताना ही टोल वसूल प्रक्रिया योग्य आहे का? असा सवाल वाहनाधारकातून व्यक्त केला जात आहे. यासाठी खानापूर तालुक्यातील वाहनधारकांनी 11 जुलैपासून होणाऱ्या या टोल वसुली प्रक्रियेला विरोध करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. खानापूर ते बेळगाव या 26 किलोमीटर अंतरापैकी केवळ 16.5 किलोमीटर महामार्गाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. पण उर्वरित महामार्गाचे काम अर्धवट आहे, वास्तविक हलगा बायपास महामार्ग ते गोवा सरहदीपर्यंत येणाऱ्या एकूण 84 किलोमीटर महामार्गावर 50 किलोमीटर अंतरावर दोन ठिकाणी टोलनाके उभारले जाणार आहेत. यापैकी गणेबैल टोलनाका तर दुसरा अनमोड नजीक बरलकोड जवळ एक नाका उभारला जाणार आहे. पण यापैकी बरलकोड नजीकच्या टोलचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. वास्तविक बेळगाव- पणजी व्हाया अनमोड या राष्ट्रीय महामार्गापैकी कर्नाटक हद्दीतील एकूण रस्त्याचे काम गेल्या बारा वर्षापासून रेंगाळत चालले आहे. यापैकी हलगा बायपास ते झाडशहापुर महामार्गाच्या भूसंपादनाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. शिवाय होणकल ते रामनगर पासून अनमोड पर्यंत गोवा सरहद्दीपर्यंत रस्त्याचे कामही अर्धवट आहे, असे असताना गणेबैल नजीक टोल वसुली करून प्रवाशांचा खिसा कापण्याचा प्रयत्न संबंधित कंपनीचा आहे. वास्तविक बेळगाव पणजी व्हाया अनमोड हा रस्ता बांधा, वापरा आणि हस्तांतर करा, अर्थात BOOT या तत्त्वावर हाती घेण्यात आला आहे. अशोका बिल्डकॉन कंपनीने बेळगाव पासून खानापूर पर्यंतचे आपले काम पूर्ण केले आहे. अनमोड पर्यंतच्या रस्त्याचे व हलगा बायपास रस्त्याचे काम पूर्ण होण्याची वाट पहात आहे. पण गणेबैल टोलनाक्या जवळचा बेळगाव ते खानापूर जवळ 16.5 किलोमीटर रस्ता पूर्ण झाल्यामुळे हा रस्ता सध्या वापरात आला आहे. यामुळेच बिल्डकॉन कंपनीने ही टोल प्रक्रिया हाती घेण्याचे काम अवलंब केले आहे.
वास्तविक 84 किलोमीटर संपूर्ण रस्ता पूर्ण झाल्याशिवाय दोन्ही टोल सुरू करणे असा नियम आहे. पण यासाठी बिल्डकॉन कंपनीने टोल सुरू करण्यासाठी पूर्ण झालेल्या साडेसोळा किलोमीटर रस्त्याला निर्धारित शुल्क आकारून टोलप्रक्रिया हाती घेण्याची घिसाडघाई केली आहे. पण ही घिसाडघाई सर्वसामान्य वाहनधारकांना आर्थिक खिसा कापणारी आहे.
एकीकडे रस्त्याचे काम अर्धवट तर दुसरीकडे खानापूर बायपास व खानापूर तालुक्याच्या अनेक भागातून भूसंपादित करण्यात आलेल्या जमिनीचे नुकसान भरपाई ही अद्याप पूर्ण झाली नाही जिल्हाधिकाऱ्यांच्या आवार्ड प्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठीही अनेक शेतकरी न्यायप्रविष्ठ आहेत.
यासाठी भूसंपादित शेतकरी उद्या मंगळवार दि. 11 जुलै रोजी होणाऱ्या टोल प्रारंभवेळी जाऊन विरोध करतील का? खानापूर परिसरातील दैनंदिन बेळगावला ये जा करणारे प्रवासी देखील याला विरोध करून रस्ता महामार्ग पूर्ण झाल्यानंतरच याची प्रक्रिया हाती घेतली जाईल का ? यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे