हिरेकुडी (ता. चिक्कोडी जि. बेळगाव) येथील आश्रमाचे बेपत्ता झालेले जैन स्वामी आचार्य कामकुमार नंदी महाराज यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. पण त्या संशयित आणि त्या जैन मुनि चा मृतदेह नेमका कुठे फेकला आहे याचा तपास सुरू पोलिसांनी हाती घेतला आहे. याप्रकरणी चिक्कोडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून दोघांना संशयावरून ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान जैनमुनी यांची हत्या झाल्याचे उघड झाले. दोन्ही आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केली मात्र त्यांनी खून करून मृतदेह कोठे फेकून दिला याबाबत स्पष्ट माहिती दिलेली नाही. त्यांनी पहिल्यांदा खून करून मृतदेह कापून कटकबावी गावात उघड्या बोअरवेलमध्ये टाकल्याचे सांगितले. तर दुसऱ्यांदा मृतदेह कापडात गुंडाळून नदीत फेकल्याचे सांगितले. रात्रभर कटकबावी गावात तपासणी करूनही पोलिसांना मृतदेह सापडला नाही.
गेल्या दोन दिवसांसापूर्वी म्हणजेच बुधवारी ते बेपत्ता झाले होते. दरम्यान रायबाग तालुक्यातील कटकबावी गावात महाराजांची हत्या झाल्याची माहिती मिळताच बेळगाव जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, बेळगाव जिल्ह्याच्या चिक्कोडी तालुक्यातील हिरेकुडी गावात असलेल्या नंदीपर्वत आश्रमाचे जैनमुनी आचार्य श्री १०८ कामकुमार नंदी महाराज हे दोन दिवसांपासून बेपत्ता होते. ६ जुलै रोजी स्वामीजी बेपत्ता झाल्यानंतर भक्तांनी त्यांचा आश्रमाभोवती शोध घेतला. त्यानंतर काल आचार्य कामकुमार नंदी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भीमप्पा उगारे यांनी चिक्कोडी पोलिस स्थानकात स्वामीजी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
याबाबत अधिक माहिती देताना बेळगाव जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. संजीव पाटील म्हणाले, स्वामीजी बुधवारी रात्रीपासून बेपत्ता होते. भक्तांनी शुक्रवारी स्वामीजी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. भाविकांच्या तक्रारीच्या आधारे आम्ही तपास केला होता. तपासा दरम्यान आश्रमात आलेल्या गेलेल्यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान स्वामीजींना ओळखणाऱ्या एका व्यक्तीची आम्ही चौकशी केली. त्या व्यक्तीने आश्रमात महाराजांची हत्या करून मृतदेह इतरत्र टाकल्याची माहिती दिली. या प्रकरणात मदत करणाऱ्या एकासह आम्ही दोन आरोपींना अटक केली आहे. स्वामीजींनी पैसे परत मागितल्याने त्यांची हत्या केल्याची कबुली संशयितांनी दिली असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रकरणाचा तपास सुरू असून पुरावे गोळा करून ते न्यायालयात सादर करण्याच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळी कोणालाही प्रवेश नाही. अन्य काही धंदा होता का, याचाही तपास सुरू आहे. स्वामीजींनी पैसे परत मागितल्याने वैयक्तिक कारणावरून हत्या करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आरोपींनी नमूद केलेल्या अनेक भागात स्वामीजींच्या मृतदेहाचा शोध घेतल्याचे त्यांनी सांगितले.
हिरेकुडी जैनमुनी कामकुमार नंदी महाराज यांच्या हत्याप्रकरणाने हिरेकुडी गावावर शोककळा पसरली असून खबरदारीचा उपाय म्हणून हिरेकोडी गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.