खानापूर /प्रतिनिधी ; गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:।
गुरु: साक्षात् परंब्रह्म तस्मै श्री गुरवे नम:।
संस्कृत भाषेतील हा श्लोक सर्वांचाच तोंडपाठ आहे. या श्लोकात गुरूंचा महिमा व गुरूंची महती गायली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात गुरूचे महत्व अनन्यसाधारण असते. गुरुचे जीवनातील स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. गुरु शिष्याच्या दुर्गुणांना दूर करून त्याच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करतात. ज्या व्यक्तीला एका चांगल्या गुरूचा सहवास लाभला नाही त्याचे जीवन अंधकारमय असते. गुरु आपणास जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. आजच्या युगात गुरूला शिक्षक म्हणूनही संबोधले जाते. शिक्षक आपल्या शिक्षणाच्या मदतीने व्यक्ती, समाज आणि राष्ट्राची निर्मिती करतो. त्यांच्या शिक्षणामुळेच विद्यार्थ्यात आत्मविश्वास निर्माण होतो. आणि आयुष्यात काहीतरी मोठे ध्येय प्राप्त करण्यासाठी त्याला प्रेरणा मिळते. अर्जुन, द्रोणाचार्य -एकलव्य, आर्य चाणक्य- चंद्रगुप्त मौर्य, श्री रमाकांत आचरेकर व सचिन तेंडुलकर यांची उदाहरणे देऊन गुरू व शिष्य यांच्यातील नात्याला किती महत्त्व आहे. याचे विचार स्वामी विवेकानंद इंग्रजी माध्यम शाळेचे अध्यक्ष व अधिवक्ते चेतन मनेरिकर यांनी व्यक्त केले
सोमवारी श्री स्वामी विवेकानंद इंग्रजी माध्यम शाळा, मठ गल्ली, खानापूर येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी पालकांना आमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे चरण स्पर्श करून व फुले वाहून आशीर्वाद घेतले. शिक्षक व शिक्षकेतर वर्गाला शाळेच्या परंपरेप्रमाणे गुरुदक्षिणा देण्यात आली. विद्यार्थी वर्गाने गुरुपौर्णिमा विषयावर भाषण केले. प्राचार्या सौ.श्रद्धा दिपक पाटील यांनी गुरुपौर्णिमेची महती सांगितली. संस्थेचे माजी कार्यदर्शी श्री सदानंद कपिलेश्वरी यांनीही गुरुपौर्णिमेचा इतिहास थोडक्यात व्यक्त केला. शिक्षिका सौ.ज्योती जांबोटकर यांनी आभार मानले. या वेळी बहुसंख्य शिक्षक वर्ग उपस्थीत होता.