खानापूर/ प्रतिनिधी; खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेला दारून पराभव लक्षात घेता नैतिक जबाबदारी स्वीकारून खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्र जाहीर केले होते. यापैकी एक _दोन पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच लेखी राजीनामे दिले आहेत. तर आणखी काहींनी राजीनामे देण्याची घोषणा केली आहे. यावरून आज शिवस्मारकात झालेल्या समितीच्या सर्वसाधारण बैठकीत पदाधिकाऱ्यांचे राजीनामे हा पर्याय नसून संघटना कशी बळकट करावी यावर विचार मंथन होणे गरजेचे असून राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांच्या अर्जाचाही फेरविचार व्हावा व नूतन पदाधिकाऱ्यांची निवड व ज्यानी अद्याप राजीनामे दिले नाहीत. त्यांची विचारमंतने घेऊन लवकरच सर्वानुमते एक व्यापक कमिटी नियुक्त करण्यात यावी अशी मागणी अनेकांनी केली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एकीकरण समितीचे जेष्ठ नेते व माजी आमदार दिगंबर पाटील होते.
खरंतर, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दारुण पराभवानंतर मागील आठवड्यात चिंतन बैठक पार पडली. या बैठकीत अनेकांनी समिती पदाधिकाऱ्यांच्यावर नैतिक जबाबदारीचे शरसंधान साधून नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्यात यावा अशी अनेकांनी मागणी केली होती. त्यामुळे अनेकांनी आपले राजीनामे सादर केले. तर काहींनी आपणही राजीनामे देण्याची घोषणा केली होती. पण या बैठकीला अनेकांची अनुपस्थिती राहिल्याने केवळ चिंतन बैठकीत राजीनामा स्वीकारणे योग्य नव्हते असे विचार अनेकानी मांडले.
आजच्या बैठकीत संघटनेला पुनर्जीवन प्राप्त करण्यासाठी सक्षम पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी यावर विचारमंथन करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. आजच्या बैठकीत याबद्दल आक्षेप नोंदविला गेला. समिती उमेदवार मुरलीधर पाटील यांच्या पराभवाला फक्त पदाधिकारी जबाबदार राहू शकत नाहीत. सर्वांनी आपले काम प्रामाणिक केले आहे. पण समितीची एकीकडून आणण्यासाठी तसेच समितीचे योग्य कार्य मतदारांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी संघटना कमी पडली. शिवाय यावेळीच्या निवडणुकीत खानापूर तालुक्याच्या नेतृत्वातील फेरबदलाचाच विचार झाल्यानेच भाजप उमेदवार विठ्ठल हलगेकर यांना मोठे मताधिक मिळाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समिती चे मतदार संपले असे म्हणणे योग्य नाही. तालुक्यातल्या राजकीय परिस्थितीनुसार हा बदल झाला आहे. यामुळे याची नैतिक जबाबदारी ही पदाधिकाऱ्यांची नाही, अनेक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे मतदारांच्या पर्यंत पोहोचून कार्य केले आहे. पण मतदारांच्या मानसिकतेचा मागोवा लक्षात घेतला मतदान कोणाला करावे हा निर्णय मतदाराने अगोदरच घेतला होता. त्यामुळे याची कारणमीमांसा शोधून पराभवाचे खापर कोणावर तरी फोडणे योग्य नाही. त्यापेक्षा या समितीची पालखी नीटनेटकीपणाने खांद्यावर घेऊन चालवण्यासाठी आता योग्य पदाधिकाऱ्यांची फेररचना करणे गरजेचे आहे.यासाठी समिती संघटना मजबुतीसाठी वेळ देणारा, प्रसंगी आर्थिक बाबीतून सक्षम व सर्वांना विश्वासात घेऊन नव्या जोमाने काम करणारा, या पदावर योग्य ठरणार आहे. शिवाय सीमा प्रश्न न्यायालयात असला तरी या प्रश्नाला पाठपुरावा करून प्रश्नांची रणनीती व वेळोवेळी होणारी आंदोलने झोपणारा पदाधिकारी आवश्यक आहे. या सर्व बाबीची साधक वादक चर्चा करूनच योग्य पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात यावी असा निकष यावेळी अनेकांनी मांडला.
शिवाय खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती ही भक्कम आहे, यापूर्वी विभागलेली समिती एकीकरणासाठी मध्यवर्तीचे बोट धरावे लागले हे जरी खरे असले तरी आतापर्यंतच्या इतिहासात घटक समितीनेच अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे या पुढच्या काळातही निवड करताना किंवा निर्णय घेताना मध्यवर्तीकडे बोट करण्यापेक्षा घटक समितीतून एकनिष्ठता राखून समितीची संघटना बळकट करूया, असे विचार मांडण्यात आले. खानापूर तालुक्यात मार्केटिंग सोसायटीच्या भ्रष्टाचारासंदर्भात कार्यकर्त्यांनी उठवलेला आवाज याला महाराष्ट्र एकीकरण समितीने पाठ्वळ देऊन यावर आवाज उठवण्यात यावा असे विचार अनेकांनी मांडले. यावेळी विलास बेळगावकर, मुरलीधर पाटील, यशवंत बिरजे ,रुक्मणा झुंजवाडकर, गोपाळराव पाटील, ए.डी देसाई, महादेव घाडी, बाळाराम शेलार, पांडुरंग सावंत, आबासाहेब दळवी, डीएम गुरव, जयराम देसाई, जगन्नाथ बिरजे, आदींनी यावेळी विचार मांडले.
यावेळी माजी सभापती मारुती परमेकर यांनी झालेल्या चर्चेचा वृत्तांत लक्षात घेता मागील बैठकीत पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याची घोषणा केली, आणि ती बातमी वृत्तपत्र व सोशल मीडियातून जाहीर झाली आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचा विचार होणे गरजेचे आहे. त्यानंतर पुन्हा पदाधिकाऱ्यांची कशी नियुक्ती करता येईल. पुन्हा नवीन, जुने घेऊन कशा पद्धतीने निकष काढता येईल, याचा विचार होणे गरजेचे असल्याचे मत मांडले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी आमदार दिगंबर पाटील यांनी एकंदरीत समितीच्या पराभवाचा निकष व समितीच्या बळकटीचा विचार लक्षात घेता योग्य निर्णय घेऊन समितीची पालखी कुणाच्या खांद्यावर द्यावी. या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले. या बैठकीला अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.