नवी दिल्ली – देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. २८ जून रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऊसाची किमान आधारभूत किंमत म्हणजेच एमएसपी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ऊसावरील एमएसपी प्रति क्विंटल १० रुपयांनी वाढविण्यात आली आहे. कृषि लागत आणि मुल्य आयोगाने यापूर्वीच सरकारकडे यासंदर्भात शिफारस केली होती. आता, कॅबिनेटच्या बैठकीनंतर सरकारने यास मंजुरीही दिली आहे.
सरकारद्वारे वाढविण्यात आलेली एमएसपी नवीन ऊस हंगामापासून लागू होणार आहे. १ ऑक्टोबर २०२३ च्या हंगामानुसार ही सुरुवात होत आहे. ३० डिसेंबर २०२४ पर्यंत यंदाचा हंगाम सुरू राहिल. सन २०२१ मध्ये ऊसाच्या एमएसपीमध्ये ५ रुपयांची वाढ करुन ती २९० रुपये करण्यात आली होती. त्यानंतर, २०२२ मध्ये त्यात १५ रुपयांची वाढ करुन ती ३०५ पर्यंत पोहोचवण्यात आली. आता, त्यात आणखी १० रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे, ऊसाच्या यंदाच्या नवीन हंगामात एमएसपी ३१५ रुपये करण्यात आली आहे.
दरम्यान, उत्तर कर्नाटक,महाराष्ट्रात ऊसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात असून साखर कारखान्यांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे, राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ होईल.