गेल्या दीड दोन महिन्यापासून गायब झालेल्या मान्सूनने अखेर हजेरी लावली आहे. हवामान खात्याने आगामी दोन दिवसात मान्सून जोरदार बसेल असा अंदाज व्यक्त केला होता. पण त्या अंदाजापूर्वीच शुक्रवारी दुपारी चार च्या दरम्यान खानापूर तालुक्याच्या सर्वत्र पश्चिम भागातून मान्सूनच्या दमदार सरी सुरू झाल्या. त्यामुळे उन्हाळी पिकांना दिलासा मिळाला आहे. डिसेंबरच्या सुगी हंगामानंतर या वर्षी अवकाळी पावसाने पूर्णतः पाठ फिरवली. जून महिन्यात सुरु होणाऱ्या मान्सूनच्या आगमनाकडे टक लावून बसलेल्या शेतकरी वर्गाला तब्बल मान्सून ने दीड महिना हुलकावणी दिली. त्यामुळे शेतकऱ्यासमोर दुबार पेरणीचे संकट उभारले आहे. शेतकऱ्यांनी यावर्षी बहुतांशपणे धुळीच्या हंगामात पेरण्या केल्या आहेत.
खानापूर तालुक्यात तब्बल 42 हजार हेक्टर जमिनीमध्ये भात पेरणी केली जाते त्यापैकी जवळपास 28 हजार हेक्टर जमिनीत भात पेरणी होते. तर उर्वरित जमिनीत रोप लागवडीची कामे केली जातात पण यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने धुळीत पेरलेली बी बियाणे पूरक पाण्याअभावी कुजली आहेत. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यासमोर दुबार पेरणीचे संकट उभा टाकले आहे.
त्यामुळे आता मान्सूनने पूरक ओलावा करावा अशी बळीराजाची अपेक्षा आहे. ओलावा झाल्यानंतर पेरलेली बियाणे उगवणार की दुबार पेरणी करावी लागणार याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे. एकंदरीत शुक्रवारी सायंकाळ नंतर दमदारपणे मान्सूनने हजेरी लावल्याने हवामानात बराच बदल दिसून आला. उन्हाच्या तडाख्याने तापलेल्या नागरिकांनाही दिलासा मिळाला. शिवाय उन्हाळी ऊस पिके करपून जात होती ,त्याही पिकांना या मान्सूनच्या हजेरीमुळे दिलासा मिळाला असून आगामी दोन-चार दिवसात मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.