नवी दिल्ली : दिल्ली वेधशाळेने दिलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार तहानलेल्या उत्तर कर्नाटकासह महाराष्ट्राला मान्सूनचा पाऊस चिंब भिजविणार आहे. २४ जूनपासून मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
शुक्रवार पासून कोकणात
कोकण किनारपट्टीवर कालपासून पावसाचे पोषक वातावरण निर्माण झाले आहे. गोव्यातही काल रात्री बऱ्याच अंशी पर्जन्यवृष्टी झाली. पण सततधार पावसाची वाट गोवेकर ही पाहत आहेत. उन्हाने तहानलेल्या गोवेकरसह उत्तर कर्नाटक व कोकण भागात मोठ्या पावसाची आस निर्माण झाली आहे.
हवामान खात्याने आता वाट बघण्याची गरज नाही येत्या दोन दिवसात म्हणजे २३ ते २९ जूनदरम्यान मध्य भारतात चांगल्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर ३० जून ते ६ जुलै दरम्यान मान्सून भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर सक्रिय राहील, असाही अंदाज वर्तविण्यात आला असून, अनुकूल हवामानामुळे शुक्रवारपासून दक्षिण कोकणात पाऊस जोर पकडणार आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, ओडिशा, बिहार आणि झारखंड या सहा राज्यांमध्ये उष्णतेची लाट होती. मात्र, महाराष्ट्रासह मध्य भारतातील वातावरण बदलण्यास सुरुवात झाली आहे.