पुणे: कर्नाटकाच्या मातीचा सुगंध वास घेऊन महाराष्ट्रातील पुणे सारख्या शहरात वास्तवात राहून अनेक उद्योजकांनी पुणे भागात एक चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. पुणे स्थित बेळगावकर यांच्या कुटुंबातील अनेक विद्यार्थी आज महाराष्ट्रात उच्च शिक्षित होत, नावलौकिक करत आहेत. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व गुणवंत विद्यार्थी घडावेत यासाठी पुणे येथील खानापूर बेळगाव मित्रमंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम या मंडळाने केले आहे. ते कौतुकास्पद असल्याचे विचार महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी प्रमुख अतिथी या नात्याने बोलताना व्यक्त केले. खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ पुणे आयोजित खानापूर-बेळगाव, रामनगर, हलियाळ, अळणावर व तत्सम भागातील पुणेस्थित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि विद्यार्थी- पालक मार्गदर्शन मेळावा रविवारी सुवासिनी मंगल कार्यालय, वडगांव बुद्रुक, पुणे या ठिकाणी उस्फुर्तपणे पार पडला, यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमात विश्वास उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब पोकळे, भाजपा युवा मोर्चाचे सहचिटणीस सारंग नवले प्रमुख पाहुणे म्हणून तर प्रख्यात करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर आणि सुप्रसिद्ध उद्योजक राजेश मंडलिक उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष पीटर डिसोझा हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
दीपप्रज्वलनानंतर सौ. रमा बाळेकुंद्री यांनी गणेश वंदना तर संचालक केशव जावळीकर यांनी प्रार्थना सादर केली. सचिव शिवाजी जळगेकर यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले.
या कार्यक्रमाला इयत्ता दहावी आणि बारावीचे अनेक विद्यार्थी आणि पालक तसेच मंडळाचे अनेक सभासद सहपरिवार व मित्र परिवारासह उपस्थित होते. उत्तीर्ण व गुणवंत विद्यार्थ्याबरोबरच खेळाडूंचाही यावेळी गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. मंडळाचे उपाध्यक्ष नारायण पाटील यांनी आपले वडील कै. रामचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम बक्षिसे दिली तर शांताराम बडसकर आणि नितेश पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना विवेक वेलणकर लिखित “१०वी/१२वी नंतरची शाखानिवड” हे पुस्तक भेट दिले. याप्रसंगी उपस्थित पाहुणे आणि वक्त्यांनी सर्व विद्यार्थी व पालकांना मौलिक मार्गदर्शन केले. सह-सचिव सुरेश हालगी आणि सह-खजिनदार परशुराम निलजकर यांनी सुत्रसंचलन केले तर संचालक देमानी मष्णूचे यांनी आभारप्रदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे उपाध्यक्ष लक्ष्मण काकतकर, बाळासाहेब देसाई, रामचंद्र निलजकर, अशोक पाटील, रामू गुंडप, विजय पाटील, रामचंद्र बाळेकुंद्री, संचालक बाळकृष्ण पाटील, नारायण गावडे, राजाराम शिंदे, पांडुरंग पाटील, परशुराम चौगुले यांबरोबरच अनेक सभासदांनीही अथक परिश्रम घेतले.