खानापूर /प्रतिनिधी : कर्नाटकात महत्वकांक्षी शक्ती योजना अमलांत आणल्यानंतर महिलांनी खानापूर तालुक्यात याचा चांगलाच लाभ उठवला आहे. गेल्या दोन दिवसात खानापूर तालुक्यातील जवळपास अडीच लाखाहून अधिक महिलांनी बस प्रवासाचा लाभ घेतला. पण हा प्रवास खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागाची जोडणाऱ्या बसेस्सी असला तरी खानापूर शहर परिसरातील तीन ते चार किलोमीटर अंतरावर येणाऱ्या महिला नागरिकांना याचा लाभ मिळणे दुरापास्त झाले आहे. सध्या खानापूर शहराचा विस्तार चौफेर वाढत चालला असून शहरासह उपनगर परिसरात लोक वस्ती वाढत चालली आहे. यासाठी या योजनेचा लाभ तसेच खानापूर उपनगर परिसरात राहणाऱ्या शाळकरी मुलांनाही याचा लाभ मिळावा यासाठी खानापूर शहराच्या उपनगरीय भागात सिटी बसेस सोडण्याची सुविधा करण्यात यावी अशी सूचना खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी खानापूर बस आगार प्रमुख महेश तिरकनावर यांच्याकडे केली आहे.
मंगळवारी सायंकाळी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी खानापूर आगाराला भेट दिली. व खानापूर तालुक्यातील बस सुविधा व परिस्थितीची माहिती घेतली खानापूर तालुक्यात आतापर्यंत 68 शेड्युल बस आगाराने घेतले असले तरी अपुऱ्या बसेस आहेत यासाठी अतिरिक्त बसेस खानापूर आगाराला देण्यात याव्या अशी विनंती परिवहन मंत्री यांच्याकडे केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
खानापूर परिसरातील तीन ते चार किलोमीटर भागात कायमस्वरूपी सिटी बस?
खानापूर शहराची लोकसंख्या जवळपास 20 हजारहून अधिक आहे. त्याशिवाय शहराच्या उपनगरीय भागात व शहराला जोडणाऱ्या तीन ते चार ग्रामपंचायतीतून अनेक नागरिक महिला व शाळकरी मुले दैनंदिन शहरातील शाळांना येतात. परंतु पूरक बस सुविधा नसल्याने या भागातील नागरिकांना महिलांना खाजगी वाहनाचा वापर करावा लागत आहे. यासाठी खानापूर मुख्य बस आगार स्थानकापासून जांबोटी रोड, पारिश्वाड रोड , नंदगड रोड या भागात बस सुविधा कशी करता येईल याची चर्चा केली. चर्चेअंती जिल्हा आगार प्रमुखांशी चर्चा करून खानापूर मुख्य आगारापासून कौंदलपर्यंत ,खानापूर मुख्य आगारापासून लैला साखर कारखान्यापर्यंत, खानापूर बस आगारापासून रामगुरवाडी क्रॉस पर्यंत, तसेच खानापूर बस आगारातून मराठा मंडळ पदवी कॉलेज पर्यंत अशा प्रमुख मार्गावर तसेच शहरातील मारुती नगर भागातून फिरत्या बसेस सोडण्यात याव्यात. यासाठी आगारातून एक बस शहर परिसरात एक कायमस्वरूपी बस सुविधा करण्यात यावी अशी सूचना आमदारांनी यावेळी मांडली. या उत्तम मांडणीचे आगार प्रमुखासह जिल्हा आगार प्रमुखांनीही स्वागत केले असून लवकरच या संदर्भात प्रक्रिया हाती घेऊन जनतेला सुविधा उपलब्ध करून देण्याची हमी आगार प्रमुखांनी दिली आहे. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी खानापूर शहर परिसरातील नागरिकांच्या साठी सिटी बस चा ठेवलेल्या प्रस्तावाबद्दल स्वागत होत आहे.