80 वर्षांवरील मतदार, दिव्यांगांना घरबसल्या करता येणार मतदान

खानापूर तालुक्यात 657 मतदार

प्रतिनिधी: खानापुर

विधानसभेच्या 224 मतदारसंघांमध्ये10 मे रोजी मतदान होणार आहे. तर 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. मात्र, शनिवारपासूनच म्हणजे 29 एप्रिलपासून मतदान प्रक्रिया सुरू होईल. 29 एप्रिल ते 6 मे पर्यंत राज्यभरात बॅलेट पेपरद्वारे मतदान होणार आहे,

केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रथमच कर्नाटकामध्ये 80 वर्षांवरील मतदार, दिव्यांग मतदारांसाठी घरबसल्या मतदान करण्याची सोय केली आहे. त्यांना शनिवारपासून आठ दिवस घरातून मतदान करता येणार आहे. उर्वरितांना 10 मे रोजी मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावता येईल.

कसे होणार मतदान…

निवडणूक आयोगाचे कर्मचारी 80 वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांना त्यांच्या दारातच बॅलेट पेपर देतील. या ठिकाणी गुप्त पद्धतीने मतदान होईल. यावेळी तेथे स्थानिक पोलीसही उपस्थित राहणार आहेत. शिवाय या प्रक्रियेचे चित्रिकरण केले जाईल. मतदानानंतर मतपेट्या स्ट्रॉंग रुममध्ये सुरक्षित ठेवल्या जातील. बॅलेट पेपरद्वारे झालेल्या मतपत्रिकांची मोजणीही 13 मे रोजी होईल. त्या दिवशीच मतपेट्या उमेदवार किंवा त्यांच्या निवडणूक एजंटांच्या उपस्थितीत उघडल्या जातील.

खानापूर तालुक्यात ज्येष्ठ व दिव्यांग 657 मतदार

निवडणूक आयोगाच्या ‘होट फ्रॉम होम’ या योजनेअंतर्गत 80 वर्षावरील जेष्ठ मतदार व दिव्यांग मतदारांना मुभा दिली आहे. या अनुषंगाने खानापूर तालुक्यामध्ये 657 मतदार आहेत. यामध्ये 80 वर्षावरील 483 तर 174 दिव्यांग मतदार आहेत. सदर मतदारांचे मतदान प्रक्रिया प्रारंभ करण्यात आले असून खानापूर तालुक्यात यासाठी पुलिंग ऑफिसर, सहाय्यक पुलिंग ऑफिसर सह अधिकाऱ्यांची एक विशेष टीम करून कार्याला सुरुवात झाली आहे. या अनुषंगाने खानापूर तालुक्यामध्ये 12 विभाग ठरवण्यात आले आहेत.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us