खानापूर: कर्नाटक विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आज पासून जारी करण्यात आल्याने खानापूर तालुका प्रशासनाने ही निवडणुकीची तयारी हाती घेतली आहे. खानापूर तालुक्यात 255 मतदान केंद्रे असून प्रत्येक मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था आवश्यक सुविधा, नेटवर्क सुविधा पुरविण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती खानापूर तालुका निवडणूक अधिकारी श्रीमती अनुराधा वस्त्रद यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेद्वारे दिली. यावेळी तहसीलदार प्रवीण गायकवाड, पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक, तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी गौडर, नंदगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोकाशी आदी उपस्थित होते
या संदर्भात निवडणूक अधिकारी वस्त्रद म्हणाल्या, खानापूर तालुक्यात तब्बल 2 लाख 8 हजार 627 मतदार असून त्यामध्ये 1 लाख 7,776 पुरुष तर 1 लाख 8 हजार 39 महिला मतदार आहेत. तर 12 मतदार तृतीयपंथीय आहेत.
खानापूर तालुक्यात 6 मतदान केंद्रे अतिसंवेदनशील तर 12 मतदान केंद्रे संवेदनशील असून या मतदान केंद्रावर आवश्यक नियोजन हाती घेण्यात आले आहे ,
शासकीय कामांना बंधने,
राजकीय पक्ष अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांना राजकीय व्यासपीठ अथवा कार्यक्रम आयोजित करताना परवाना घेणे आवश्यक आहेत. शासनाच्या नवीन योजना, पूजा, अनुष्ठान किंवा नोटिफिकेशन करण्यावर बंदी आहे. मंजूर झालेल्या निविदा देखील स्थगित करण्यात आल्या आहेत. मंत्री, आमदार, खासदार यांना सरकारी वाहने वापरावर किंवा विश्राम धाम वापरावर बंदी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
चार ठिकाणी चेक पोस्ट
खानापूर तालुक्यात 4 ठिकाणी चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी पाच जणांची तीन पथके नियुक्त करण्यात आली असून याशिवाय भरारी पथकेही स्थापन करण्यात आली आहेत.प्रत्येक चेक पोस्टवर वाहनांची कसून तपासणी केली जात असून कोणताही अवैध व्यवहार होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.
तहसीलदार कार्यालयात एक खिडकी काउंटर
तहसीलदार कार्यालयात एक खिडकी काउंटर स्थापन करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारचा परवाना घेण्यासाठी काउंटरमध्ये अर्ज करणे अनिवार्य आहे. सकाळच्या सत्रात अर्ज केलेल्यांना सायंकाळपर्यंत परवाना व सायंकाळच्या सत्रात अर्ज केलेल्यांना दुसऱ्या दिवशी आवश्यक परवाना देण्यात येणार आहे.
उमेदवाराला 40 लाखाची खर्च मर्यादा
विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला 40 लाखापर्यंत खर्च करण्यास मर्यादा असून त्याचा चौक हिशोबही निवडणूक आयोगाकडे देणे अनिवार्य असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
मतदार नोंदणीसाठी 10 एप्रिल पूर्वी अर्ज करण्याचे आवाहन
ज्या व्यक्तीचे वय 18 वर्षे पूर्ण झाले आहे, अशा व्यक्तींनी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी विहित नमुन्यातील 6 नंबर फॉर्म भरून ऑनलाईन अथवा गावातील शाळा शिक्षक किंवा तहसीलदार कार्यालयातील काउंटरमध्ये करावे. 10 एप्रिल नंतर आलेल्या अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मराठा मंडळ मध्ये प्रशिक्षण केंद्र व स्ट्रॉंग रूम
यावेळी खानापूर येथील मराठा मंडळ मध्ये निवडणूक प्रशिक्षण केंद्र व स्ट्रॉंग रूमची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशस्त जागा व वर्ग खोल्यांची जागा उपलब्ध असल्याने या वेळेला मराठा मंडळ सिद्धिविनायक स्कूलमध्ये नियोजन करण्यात आले आहे.
खानापूर तालुक्यात जवळपास 19 मतदान केंद्रावर कोणत्याही प्रकारचे नेटवर्क नाही.अलीकडे जिओ नेटवर्क आल्याने व्यवस्था करण्यात आली आहे तर उर्वरित ठिकाणी नेटवर्क उपलब्ध करण्यासाठी क्रम हाती घेण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार गायकवाड यांनी यावेळी दिली