खानापूर /प्रतिनिधि
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची एकी झाल्याने खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकाचा आनंद द्विगुणित झाला होता.असे असताना पुन्हा महाराष्ट्र एकीकरण समितीतील एका नाराज गटाने आपली वेगळी चूल मांडून स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. त्यामूळे खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीत पुन्हा ये, रे माझ्या मागल्या, होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
खानापूर तालुक्यात महाराष्ट्र एकीकरण समितीची मध्यवर्तीच्या पुढाकाराने तीन महिन्यापूर्वी एकीची वज्रमूठ झाली. 2018 नंतर दुभंगलेली समिती एकीच्या झेंड्याखाली आली आणि समितीच्या कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पण मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली निवड करण्यात आलेल्या तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी निवडीवर अंतर्गत नाराजी व्यक्त करत विरोध दर्शविलाजात होता. दोन महिन्यापासून नाराज गटाची गुप्त बैठक होऊन स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा निर्णय चर्चेत होता. अखेर याची घोषणा करत त्या गटाने खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नावे प्रति समितीची संघटना स्थापन केली आहे. सोमवारी नंदगड येथे माऊली देवी मंदिरात ज्येष्ठ नागरिक पि.के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आपल्या स्वतंत्र गटाची घोषणा केली. व खानापूर तालुका अध्यक्षपदी सूर्याजी सहदेव पाटील (जळगे) यांची निवड घोषित केली आहे.
राजू पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर माजी सभापती व समितीचे ज्येष्ठ नेते सुरेश देसाई यांनी समिती स्थापने मागचा उद्देश स्पष्ट केला. यानंतर समितीतील इतर पदाधिकाऱ्यांची लवकरच घोषणा करण्यात येणार असून इच्छुकांनी समितीकडे नावे द्यावीत असे आवाहन यावेळी केले. सूर्याजी पाटील यांची एकमताने निवड झाल्यानंतर त्यांचा फेटा बांधून व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. निवडीला समितीचे ज्येष्ठ नेते व मार्केटिंग सोसायटीचे माजी चेअरमन पी.एच.पाटील यांनी अनुमोदन दिले. या बैठकीला शिवसेनेचे ही कार्यकर्ते उपस्थित होते. निवडीबद्दल म.ए.ज्येष्ठ नेते व एपीएमसीचे उपाध्यक्ष संभाजी देसाई, बिजगर्णी ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष दत्तू कुट्रे, नंदगड मार्केटिंग सोसायटीचे माजी चेअरमन पि.एच.पाटील, गोधोळी पी के पी एस चे चेअरमन बळीराम पाटील, शिवसेनेचे मल्लाप्पा पाटील, दयानंद चोपडे, प्रकाश पाटील यांची अभिनंदन करणारी भाषणे झाली. यावेळी मध्यवर्ती म.ए. समितीचे सदस्य रवींद्र पाटील, राजू पाटील, कल्लाप्पा बावकर,विजय पाटील,मारूती पाटील, ज्ञानेश्वर बिडकर, रामचंद्र पाटील, गजानन पाटील, आदी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
उपस्थितांच्या चर्चेतून आगामी विधानसभा निवडणुकीत खानापूर तालुका मतदार संघातून म.ए. समितीचा उमेदवार उभा करण्याचा निर्धार करण्यात केला आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यात महाराष्ट्र एकीकरण एकीला खो घालण्याचा प्रकार त्यांनी केला आहे त्यामुळे आता मराठी जनता या संदर्भात चोक उत्तर देणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.