खानापूर :
कोणत्याही प्रकारच्या सरकारी कामाचा ठेका हा ऑनलाइन निविदा प्रक्रियेद्वारे दिला जातो. यामध्ये कोणाचाही कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असे असताना खानापूर तालुका सरकारी कंत्राटदार संघटनेने आमदारांनी स्थानिक कंत्राटदारांवर अन्याय करण्याचे धोरण अवलंबिले असल्याचा केलेला आरोप बिनबुडाचा असल्याचे स्पष्टीकरण तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी यांनी दिले.
निवडणुकीच्या तोंडावर कंत्राटदार संघटनेला पुढे करून राजकीय हेतू साध्य करण्यासाठी विरोधकांकडून आमदारांच्या बदनामीचा केविलवाना प्रयत्न सुरू असून आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी कोणत्याही कंत्राटदारांना पाठीशी घालण्याचा प्रकार केला नाही असा खुलासाही त्यांनी केला.
पत्रकार परिषदेत बोलताना महादेव कोळी, ऑनलाइन टेंडर प्रक्रियेतून तालुक्यातील 27 हून अधिक कंत्राटदारांनी विविध कामे केली आहेत. पीसवर्कची कामे केलेले सगळे स्थानीक कंत्राटदारच आहेत. विकास कामांसाठी निविदा घालण्यासाठी कोणाचीही अडवणूक केलेली नाही. दोनच दिवसांपूर्वी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांना काँग्रेस पक्षाने पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले असून कंत्राटदार संघटनेला हाताशी धरून नाहक आमदारांवर चिखलफेक करण्याच्या हास्यास्पद प्रकाराला जनता निवडणुकीत उत्तर देईल. पुढे कोळी म्हणाले, तालुक्यात पहिल्यांदाच अनेक प्रलंबित विकास कामे मार्गी लागली आहेत. दवाखाना, रस्ते, पाणी पुरवठ्याच्या योजना, सरकारी कार्यालयांना स्वतःच्या इमारती या सुविधांची पूर्तता झाल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळेच आमदारांवर खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा खटाटोप सुरू असल्याचे सांगितले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जॅकी फर्नांडिस म्हणाले, आमदार डॉ निंबाळकर यांनी 60 वर्षात न झालेली कामे केली आहेत. जनतेला ती दिसत आहेत. पुन्हा काँग्रेसचा विजय निश्चित असल्याने हे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. महांतेश राऊत म्हणाले, कामांचे कंत्राट घेण्याची प्रक्रिया अतिशय पारदर्शक आहे. त्यामध्ये आमदारांचा कसलाच सहभाग नसतो. असे असताना कंत्राटदार संघटनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमदारांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो राजकीय हेतूने प्रेरित आहे.
काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे राज्य उपाध्यक्ष रियाज पटेल म्हणाले, आमदार डॉ. निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील जनता विकासाचे नवे पर्व अनुभवत आहे. आमदारांनी विकास कामात कधीही दुजाभाव केला नाही. निवडणुकीच्या तोंडावर हे खोटे आरोप करण्यात आले आहेत.
यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष चंबान्ना होसमणी, देमाण्णा बसरीकट्टी, मल्लेशी पोळ, सुर्यकांत कुलकर्णी, मधु कवळेकर, प्रमोद गुरव आदि उपस्थित होते.