खानापूर: खानापूर तालुक्यातील शिंदोळी ग्राम पंचायतीने महात्मा गांधी उद्योग खात्री योजनेअंतर्गत उत्कृष्ट काम करून बेळगाव जिल्ह्यात अग्रेसर राहिल्याने कर्नाटक सरकारच्या वतीने शुक्रवारी बेंगलोर येथील आरमने मैदान या ठिकाणी महात्मा गांधी नरेगा प्रशस्ती सन्मान समावेश कार्यक्रमात “जन संजीवनी” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
2022-23 चा राज्यस्तरीय “जल संजीवनी” पंचायत पुरस्कार माती , पाणी, वनसंवर्धन कार्यक्रम, पाणी साठवण, उपगृह आधारित नकाशा तयार करणे व नियोजन, या संदर्भात केलेल्या कामांसाठी शिंदोळी ग्रामपंचायतीला हा प्राप्त झाला आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत जनजागृती इ. योजना राबविल्या आहेत त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील केवळ एका ग्रामपंचायतीला हा पुरस्कार मिळाला आहे.
महात्मा गांधी उद्योग खात्री योजनेअंतर्गत गेल्या वर्षभरात उद्योग खात्री योजना यशस्वी राबवल्याबद्दल संपूर्ण कर्नाटकातील चार ग्रामपंचायतींना हा पुरस्कार वितरित करण्यात आला आहे. त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातून खानापूर तालुक्यातील शिंदोळी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. बेंगलोर येथे आयोजित या विशेष कार्यक्रमात कर्नाटक सरकारचे मंत्री कोटा सुब्रमण्यम, पंचायत राज्य सहसंचालक प्रमोद हेगडे आदींच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार वितरित करण्यात आला. सदर पुरस्कार वितरण प्रसंगी ग्राम पंचायतीचे विकास अधिकारी प्रभाकर भट, ग्रामपंचायत अध्यक्ष राजेश यशवंत पाटील, ग्रामपंचायत उपाध्यक्ष गणपती सुतार, ग्रामपंचायत सदस्य शंकर गावडा, सदस्य प्रतीक्षा कर्लेकर, गौरी मादार, शांता कौंदलकर, प्रीती गोरल, शोभा मादार आदी उपस्थित होते. त्याचबरोबर यावेळी ग्रामपंचायतीचे विभागीय अभियंता रवींद्र तेलसंग, तांत्रिक संयोजक मुर्गेश एकंडी आदी उपस्थित होते खानापूर तालुक्यातून शिंदोळी ग्रामपंचायतला हा जल संजीवनी पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायत समितीचे अभिनंदन होत आहे.