खानापूर/प्रतिनिधि –
कुपटगिरी गावचे ग्रामदैवत श्री भावकेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा संकल्प ग्रामस्थ कमिटीने हाती घेतला असून या मंदिराच्या नूतन बांधकामाला प्रारंभ करण्यात आला आहे. यानुसार उद्या शनिवार दि. 18 मार्च रोजी भारतीय जनता पार्टीचे नेते व लैला साखर कारखान्याचे चेअरमन श्रीमान विठ्ठल हलगेकर व त्यांच्या धर्मपत्नी सौ रुक्मिणी हलगेकर यांच्या शुभहस्ते मंदिराचा कॉलम भरणी समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
आवरोळी मठाचे मठाधीश श्री चनबसव देवरू यांच्या दिव्य सानिध्यात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ नागरिक कल्लाप्पा शामराव पाटील राहणार आहेत. कॉलम भरणी कार्यक्रमासाठी क्रीडाभारती उत्तर विभागाचे प्रमुख अशोक शिंत्रे तर प्रांत प्रमुख रघुनंदनजी यासह खानापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेतेमंडळी गावातील प्रमुख व अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. तरी कार्यक्रमाला उपस्थित राहून सार्वजनिकाने शोभा वाढवावी असे आवाहन जीर्णोद्धार कमिटी व पंच कमिटी कुपटगिरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कुपटगिरी श्री भावेश्वरी देवस्थान हे जागृत देवस्थान मानले जाते. गावच्या पूर्वेला व लैला साखर कारखान्याच्या परिसरात उंच टेकडीवर असलेल्या या देवस्थानला विशेष महत्त्व आहे.नवसाला पावणारी देवता म्हणून या श्री भावकेस्वरी देवस्थानकडे पाहिले जाते, या देवस्थानला पुरातन काळाचा इतिहास असून या देवीला पुजणारे अनेक भक्तजन आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या देवस्थानच्या दराचा प्रश्न प्रलंबित होता, पण अलीकडे गावातील काही युवा वर्ग व पंचम मंडळींनी पुढाकार घेऊन मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले आहे.