खानापूर :
अलीकडच्या काळात अवैद्यरित्या गांजाची विक्री करून शालेय मुलांसह तरुणांना अडकवण्याचे प्रकार गेल्या एक-दोन वर्षापासून अनेक वेळा चर्चेत आले. शहरातील अनेक शालेय विद्यार्थी अशा व्यसनामध्ये अडकल्याने पालक वर्ग ही त्रस्त झाला आहे. यावर कारवाई करण्यात यावी अशी अनेक वेळा मागणी होऊन ही कारवाई केली जात नसल्याने अवैध धंदा करणारे फोफावले आहेत. खानापूर शहर परिसरात शालेय विद्यार्थी आणि अल्पवयीन तरुणांना हेरून त्यांना गांजाच्या व्यसनाच्या आहारी लावणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पैशाच्या आमिषाने अवैधरित्या गांजाची विक्री करून तरुणाईला व्यसनांच्या विळख्यात लोटणाऱ्यां विरोधात पोलिसांनी कारवाईचे सत्र वारंवार हाती घेतले आहे परंतु भक्कम कारवाई होत नसल्याने पुन्हा पुन्हा गांजा विक्रीच्या प्रमाण वाढ झाली आहे.
यासंदर्भात रविवारी सकाळी साडेदहा वाजता येथील रेल्वे स्टेशन जवळील मन्सापूर रस्त्यावर गांजाची अवैध विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला खानापूर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. अल्ताफ रसूल बडोदेकर (वय 42) रा. विद्यानगर खानापूर असे त्याचे नाव असून त्याच्याकडून २७५ ग्रॅम गांजा आणि गांजा विक्री करून जमलेले अडीचशे रुपये जप्त करण्यात आले. पोलीस निरीक्षक रामचंद्र नायक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. बेळगाव गोवा महामार्ग, मलप्रभा नदी घाट, लाल पूल यासारख्या ठिकाणी चोरून गांजाचे व्यसन करणारे विद्यार्थी रात्रीसह अगदी दिवसाढवळ्याही दिसून येतात. अगदी सहजरीत्या उपलब्ध होणारा गांजा आणि गांजा माफीयांकडे आज पर्यंत पोलिसांचे झालेले दुर्लक्ष यामुळे दिवसेंदिवस गांजाच्या आहारी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना गांजा व मादक पदार्थांची विक्री करणाऱ्यांना चाप लावण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खानापूर शहरातून गांजा माफीयांना हद्दपार करण्यासाठी कठोर पावले उचलावीत अशी मागणी केली जात आहे.