गर्लगुंजी गर्ल्स हायस्कूलच्या वतीने सेवानिवृत्ती निमित्त मुख्याध्यापक हलगेकर यांचा हृद्य सत्कार
फोटो : गर्लगुंजी : विठ्ठल हलगेकर दांपत्याचा सत्कार करताना जयसिंग पाटील, राजेश्वरी कुडची, वंदना पाटील, व्ही. बी. होसुर, सलीम कित्तूर, वाय. एम. पाटील व इतर.
खानापूर लाईव्ह
ठरवून शिक्षक होण्याचे स्वप्न पाहून संघर्षातून शिक्षण घेतले. व्रतस्थ भावनेने शिक्षकी पेशा सांभाळला. कुटुंब, समाज, विद्यार्थी आणि संस्थाचालकांनी वेळोवेळी मोलाचे सहकार्य केले. त्यामुळेच 37 वर्षे प्रदीर्घ शिक्षकी सेवा बजावता आली. शिक्षकी सेवेमुळेच समाजाचे आपण देणे लागतो हा विचार मनावर ठसठशीत झाला. निवृत्तीनंतरही शिक्षण क्षेत्राशी आपली बांधिलकी कायम राहील अशी ग्वाही महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक आणि गर्लगुंजी येथील माऊली गर्ल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक विठ्ठल हलगेकर यांनी दिली.
आज गर्लगुंजी (ता. खानापूर) येथे सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माऊली एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयसिंग पाटील होते. सहसचिव अजित पाटील यांनी स्वागत करुन हलगेकर सरांनी या शाळेला आपले कुटुंब मानले. परिसराच्या शैक्षणिक तसेच इतर प्रगतीसाठी देखील त्यांनी विशेष प्रयत्न केले. भविष्यातही त्यांचे नेतृत्व समाजाला दिशा देणारे ठरणार असल्याचे सांगितले.
सत्काराला उत्तर देताना विठ्ठल
हलगेकर म्हणाले, ज्ञानदानाचे कर्तव्य पार पाडत असताना समाजाला दिशा दाखवण्याचे कार्य शिक्षक करत असतात. सामाजिक क्षेत्रात काम करण्याची उर्मी शिक्षण क्षेत्रातील अनुभवामुळेच मिळाली. गर्लगुंजी गावाने मायेची उब दिली. शिक्षण सेवेबरोबरच सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याचे पुरेसे स्वातंत्र्य दिले. त्यामुळेच समाजसेवेचे व्रत जपता आले असे सांगितले.
विश्व भारत सेवा समितीचे सचिव विजय नंदीहळ्ळी म्हणाले, कोणतीही आश्वासक पार्श्वभूमी नसताना शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले हलगेकर यांचे व्यक्तिमत्व तालुक्याच्या शिक्षण, सहकार, कृषी आणि उद्योग क्षेत्राला नवी ओळख देणारे ठरले आहे. साधेपणा आणि पराकोटीचा संयम ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये भावणारी असल्याचे सांगितले. गटशिक्षणाधिकारी राजेश्वरी कुडची, मार्केटिंग सोसायटीचे माजी चेअरमन गोपाळ पाटील, माजी ता. पं. सदस्य पांडुरंग सावंत, गर्लगुंजी ग्रा. पं. अध्यक्ष वंदना पाटील, उपाध्यक्ष अजित पाटील, सदस्य हणमंत मेलगे, सुरेश मेलगे, प्रसाद पाटील, नंदकुमार निट्टुरकर, लैला साखर कारखान्याचे एमडी सदानंद पाटील, प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष वाय. एम. पाटील, राजू सिद्धाणी, माध्यमिक शिक्षक संघटनेचे सलीम कित्तूर, व्ही बी होसुर, सुनील चिगुळकर यांनी हलगेकर सरांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी चांगाप्पा निलजकर, भरमाणी पाटील, ए. आर. अंबगी, हेलन परेरा, ज्योती कदम, राजू पाटील, संजीव वाटुपकर, एम. पी. गिरी, अनिल कदम आदी उपस्थित होते.