नेरसा :तालुका पंचायत क्षेत्रातून काँग्रेसकडून सौ. अस्मिता महेश पाटील इच्छुक!
नेरसा तालुका पंचायत क्षेत्रातून काँग्रेसकडून सौ. अस्मिता महेश पाटील इच्छुक!
सामान्य महिला आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी हालचाली; महेश पाटील यांच्याकडून पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची मागणी
खानापूर : प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात आगामी तालुका पंचायत निवडणुकीचे राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले असून, नेरसा तालुका पंचायत मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून सौ. अस्मिता महेश पाटील यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नेरसा तालुका पंचायत क्षेत्रासाठी सध्या सामान्य महिला आरक्षण निश्चित झाल्याच्या पार्श्वभूमीवर मणतुर्गा येथील सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते महेश पाटील यांनी आपल्या पत्नी सौ. अस्मिता पाटील यांच्या उमेदवारीसाठी पक्षांतर्गत पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.
महेश पाटील हे गेल्या सुमारे पंधरा वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या भागात सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये आणि संघटनात्मक उपक्रमांमध्ये त्यांचा सातत्याने सहभाग राहिला आहे. मणतुर्गा येथील मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीवर सदस्य म्हणूनही त्यांनी काही वर्षे काम पाहिले आहे. गावातील तसेच परिसरातील सामाजिक प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी आणि गरजू लोकांच्या कामांसाठी ते नेहमी पुढाकार घेत असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येते.
काँग्रेस पक्षाच्या विविध आंदोलनांमध्ये व जनसंपर्क उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. नुकत्याच राबविण्यात आलेल्या भारत जोडो युवा अभियानात त्यांनी विशेष सहभाग घेत शंभरहून अधिक युवकांना या अभियानाशी जोडण्याचे काम केल्याचे सांगण्यात येते. काँग्रेसच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणूनही महेश पाटील यांची या परिसरात ओळख आहे.
दुसरीकडे, इच्छुक उमेदवार सौ. अस्मिता पाटील या शिक्षित असून, महिलांमध्ये मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेणे, बचत गटांच्या माध्यमातून महिलांना एकत्रित आणणे आणि महिला संघटनांच्या कामात सहभाग घेणे, अशा सामाजिक उपक्रमांत त्या कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न, बचत गटांचे संघटन, महिला सक्षमीकरण आणि स्थानिक पातळीवरील विकासकामांमध्ये योगदान देण्याची त्यांची भूमिका असल्याचे सांगितले जाते.
नेरसा तालुका पंचायत मतदारसंघामध्ये मणतुर्गा, निलावडे आणि नेरसा या तीन ग्रामपंचायत क्षेत्रांचा समावेश आहे. या तिन्ही भागांतील गावांमध्ये महेश पाटील यांचा सामाजिक व राजकीय संपर्क असल्याने त्यांनी या मतदारसंघातून पत्नीच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करण्याचे ठरविले आहे. यासंदर्भात त्यांनी स्थानिक कार्यकर्ते व समर्थकांशी चर्चा करून निवडणुकीच्या दृष्टीने प्राथमिक रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
सध्या निश्चित झालेल्या सामान्य महिला आरक्षणात बदल न झाल्यास काँग्रेस पक्षाने सौ. अस्मिता महेश पाटील यांना अधिकृत उमेदवारी द्यावी, अशी मागणी महेश पाटील यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, वरिष्ठ पदाधिकारी तसेच माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्याकडे केल्याचे समजते.
एकीकडे तालुका पंचायत निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या वाढत असताना दुसरीकडे पक्षनिष्ठा, स्थानिक जनसंपर्क, सामाजिक कार्य आणि महिला नेतृत्व या मुद्द्यांभोवती उमेदवारीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे नेरसा तालुका पंचायत मतदारसंघात काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे आता स्थानिक राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.