बस उशिरा, विद्यार्थ्यांचा क्लास बुडतोय! गर्लगुंजी ग्रामस्थांचा परिवहन विभागाला इशारा!
बस उशिरा, विद्यार्थ्यांचा क्लास बुडतोय! गर्लगुंजी ग्रामस्थांचा परिवहन विभागाला इशारा!
खानापूर–गर्लगुंजी बस वेळेत सोडा; रविवारी बेळगाव–गर्लगुंजी बस पूर्ववत सुरू करा, अशी मागणी
गर्लगुंजी (प्रतिनिधी) : खानापूर आगारातून गर्लगुंजीकडे येणाऱ्या बस वेळेत धावत नसल्याने शाळकरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गेल्या १५ दिवसांपासून सकाळी ९ वाजताची बस वेळेत पोहोचत नसल्यामुळे गर्लगुंजी, निडगल, भांडरगाळी आणि बरगाव येथील विद्यार्थ्यांना शाळेतील सुरुवातीचा एक तास गमवावा लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी परिवहन विभागाकडे धाव घेत बससेवा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती नोंदवली जात असल्याने बस उशिरा आल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. विद्यार्थ्यांचा सुरुवातीचा क्लास बुडत असल्याने त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत आहे. त्यामुळे सकाळपासून खानापूर–गर्लगुंजी मार्गावरील सर्व बसफेऱ्या निर्धारित वेळेत सोडाव्यात, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय प्रवाशांची संख्या कमी असल्याचे कारण देत रविवारी बंद करण्यात आलेली बेळगाव–गर्लगुंजी बससेवा पूर्ववत सुरू करावी. रविवारी बेळगावला जाणाऱ्या आणि तेथून येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली.
यासंदर्भात बस डेपो व्यवस्थापक संतोष यांना निवेदन देण्यात आले. यावेळी गर्लगुंजीचे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील, परशराम कोलकार, सदानंद कुंभार, अजय कोलकार, रोहित नावलगी, परशराम बेळगावकर आणि संतोष नाईक उपस्थित होते.
यावेळी डेपो व्यवस्थापकांनी बेळगाव आगार तसेच डीटीओ यांच्याशी संपर्क साधून रविवारी बंद असलेली बससेवा सुरळीत करण्याचे आणि खानापूर आगारातून बस वेळेत सोडण्याचे आश्वासन दिले.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी खेळ नको!
बससेवेतील अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय यापुढे सहन केली जाणार नाही. बस वेळेत सोडल्या नाहीत आणि नागरिकांना त्रास सुरूच राहिला तर तीव्र भूमिका घेतली जाईल, असा इशारा प्रसाद पाटील यांनी परिवहन विभागाला दिला.
खानापूर लाईव्ह | जनतेचा आवाज, जनतेची बातमी