कारलगा श्री महालक्ष्मी यात्रेचे दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर बिगुल!
कारलगा श्री महालक्ष्मी यात्रेचे दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर बिगुल!
देवीला भिजत घालण्याचा धार्मिक कार्यक्रम उत्साहात; तिन्ही गावांतील भाविकांची वंदनीय उपस्थिती
तब्बल १९ वर्षांनंतर २४ फेब्रुवारी २०२७ रोजी भरणार श्री महालक्ष्मी देवीची भव्य यात्रा!
खानापूर / प्रतिनिधी : कारलगा येथील श्री महालक्ष्मी देवीच्या बहुप्रतीक्षित यात्रेच्या तयारीला दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर धार्मिक विधीने प्रारंभ झाला. यात्रेचे बिगुल वाजवत देवीला रंगकामासाठी भिजत घालण्याचा पारंपरिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. कारलगा, कारलगा-हट्टी आणि शिवोली या तिन्ही गावांतील ग्रामस्थ व भाविकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या चर्चेनंतर तिन्ही गावांतील पंचमंडळी व ग्रामस्थांनी एकत्रितपणे २४ फेब्रुवारी २०२७ रोजी श्री महालक्ष्मी देवीची यात्रा भरविण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल १९ वर्षांनंतर ही यात्रा होत असल्याने तिन्ही गावांमध्ये भक्तिमय उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यानिमित्त मंगळवारी दुपारपासून येथील श्री चव्हाटेश्वर मंदिरात तिन्ही गावांच्या ग्रामस्थ व यात्रा कमिटीची बैठक पार पडली. यामध्ये धार्मिक रीतिरिवाज, पारंपरिक प्रथा, यात्रा नियोजन आणि आगामी कार्यक्रमांच्या व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
त्यानंतर सायंकाळी चव्हाटा देवस्थान येथे वतनदारांच्या हस्ते घराणा घालण्याचा पारंपरिक विधी पार पडला. श्री महालक्ष्मी यात्रेच्या नियोजनाचा पुढील संपूर्ण काळ निर्विघ्नपणे पार पडावा, देवीचा आशीर्वाद सर्वांवर राहावा, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. त्यानंतर महालक्ष्मी देवीच्या मंदिरात विधिवत गाऱ्हाणे घालण्यात आले.
रात्री उशिरा देवीचे पुजारी, सुतार, रंगकाम करणारे कारागीर आणि प्रमुख पंचमंडळी यांच्या उपस्थितीत देवीची ओवाळणी करण्यात आली. त्यानंतर धार्मिक परंपरेनुसार एक घट बसवून त्या कलशामध्ये देवीचा प्राण समर्पित करण्यात आला. त्यानंतर देवीला भिजत घालण्याचा विधी पार पडला. या विधीने यात्रेच्या पूर्वतयारीला अधिकृतपणे सुरुवात झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत होती.
यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष मनोहर पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी, कारलगा, कारलगा-हट्टी व शिवोली या तिन्ही गावांतील प्रमुख मंडळी, महिला, युवक-युवती तसेच आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तब्बल १९ वर्षांनंतर भरणाऱ्या या यात्रेमुळे तिन्ही गावांतील धार्मिक ऐक्य, परंपरा आणि श्रद्धेचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार असून, श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेची भाविकांना आतुरता लागली आहे.