खानापूर तालुक्यातील रेशन वितरण व्यवस्था जिल्ह्यात अव्वल!ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಪಡಿತರ ವಿತರಣಾ ವ್ಯವಸ್ಥೆಯು ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿಯೇ ಪ್ರಥಮ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿದೆ!
खानापूर तालुक्यातील रेशन वितरण व्यवस्था जिल्ह्यात अव्वल!
ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदत; १७,३७७ रेशनधारकांची प्रक्रिया अद्याप बाकी
खानापूर : बेळगाव जिल्ह्यातील रेशन वितरण व्यवस्थेमध्ये खानापूर तालुक्याने अव्वल स्थान मिळविले असून, तालुक्यातील रेशन दुकानदारांच्या उत्कृष्ट कामकाजाचे गॅरंटी योजना अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी कौतुक केले. नंदगड मार्केटिंग सोसायटीच्या सभागृहात आयोजित रेशन दुकानदारांच्या मासिक बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वैभव कुलकर्णी होते. प्रमुख उपस्थितीमध्ये गॅरंटी योजना अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी, उपतहसीलदार शरणाप्पा बागेवाडी आणि आहार विभागाचे महादेव दळवी (माजी अध्यक्ष) उपस्थित होते.
यावेळी बोलताना सूर्यकांत कुलकर्णी म्हणाले की, संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात खानापूर तालुक्याची रेशन वितरण व्यवस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. रेशनधारकांना वेळेवर आणि योग्य पद्धतीने धान्य वितरण करण्याबरोबरच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीही रेशन दुकानदारांनी चांगले काम केले आहे. याबद्दल त्यांनी सर्व दुकानदारांचे अभिनंदन केले.
१७,३७७ रेशनधारकांची ई-केवायसी बाकी
खानापूर तालुक्यात अद्याप १७ हजार ३७७ रेशनधारकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित रेशनधारकांनी आपल्या गावातील रेशन दुकानात जाऊन तातडीने ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी. अन्यथा रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता असल्याने दुकानदारांनी गावागावांत जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात आले.
लोंढा-मोहिशेत रेशन वितरणाबाबत सूचना
लोंढा गावातील रेशन वितरणाबाबत मोहिशेत व लोंढा ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी लोंढा रेशन दुकानदारांना रेशन उपलब्ध झाल्यानंतर पहिल्या सहा दिवसांत मोहिशेत ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना धान्य वितरण करावे आणि त्यानंतर लोंढा ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना रेशन वाटप करावे, अशा सूचना देण्यात आल्या.
वयोवृद्ध व अंथरुणाला खिळलेल्या लाभार्थ्यांना घरपोच रेशन
अन्न सुविधा योजनेंतर्गत अंथरुणाला खिळलेले रुग्ण आणि वयोवृद्ध लाभार्थ्यांसाठी दोन टक्के लाभार्थ्यांना घरपोच रेशन वितरणाची सुविधा उपलब्ध आहे. अशा लाभार्थ्यांची यादी संबंधित रेशन दुकानदारांनी तहसील कार्यालयात सादर करून त्यांना घरपोच धान्य मिळेल, याची व्यवस्था करावी, असे निर्देश देण्यात आले.
निलावडे पंचायत क्षेत्रातील दुकानदारांना इशारा
निलावडे पंचायत क्षेत्रात रेशन वितरण करणाऱ्या दुकानदारांनी नियमितपणे किमान चार दिवस रेशन वाटप करणे बंधनकारक आहे. नियमांचे पालन न केल्यास संबंधित रेशन दुकानाचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा बैठकीत देण्यात आला.
दुकानदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार : सूर्यकांत कुलकर्णी
रेशन दुकानदारांनी आपले काम प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे करावे. दुकानांची स्वच्छता राखावी तसेच दुकानासमोरील माहिती फलक व्यवस्थित ठेवावेत. नागरिकांच्या हितासाठी चांगले काम करणाऱ्या दुकानदारांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहून त्यांना आवश्यक सहकार्य करू, असे आश्वासन सूर्यकांत कुलकर्णी यांनी दिले.
खानापूर तालुक्याची रेशन वितरण व्यवस्थेतील चांगली कामगिरी पत्रकारांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात पोहोचत असून, हा नावलौकिक कायम राखण्याची जबाबदारी सर्व दुकानदारांची आहे, असेही त्यांनी नमूद केले.
उपस्थिती : या बैठकीला मार्केटिंग सोसायटीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर निलजकर, आहार विभागाचे निरीक्षक, खानापूर तालुका रेशन असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य तसेच तालुक्यातील सर्व रेशन दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खानापूर लाईव्ह | संपादक : पिराजी कुऱ्हाडे