गर्लगुंजीचे प्रकाश कुंभार महाराष्ट्र उद्योग सेवा भूषण पुरस्काराने सन्मानित! बेळगाव येथे 31 पुरस्काराचे वितरण!
कलाशिखर परिषद २०२६’ प्रदान!
पिढ्यान्पिढ्यांचा विटा निर्मिती व्यवसाय जपत उद्योग क्षेत्रात निर्माण केली स्वतंत्र ओळख; बेळगावच्या ‘कला शिखर परिषद व गौरव सोहळ्या’त मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान!
खानापूर / प्रतिनिधी : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी येथील उद्योजक श्री. प्रकाश मऱ्याप्पा कुंभार यांना त्यांच्या उल्लेखनीय व्यावसायिक कार्याची दखल घेत बेळगाव येथे आयोजित ‘कला शिखर परिषद व गौरव सोहळा २०२६’ मध्ये प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र उद्योग सेवा भूषण पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.
प्रकाश कुंभार यांचा मूळ व्यवसाय विटा निर्मितीचा आहे. त्यांच्या कुटुंबाचा हा व्यवसाय आजोबा-पणजोबांच्या काळापासून सुरू असून, अनेक पिढ्यांची व्यावसायिक परंपरा त्यांनी आजही जपली आहे. पारंपरिक विटा निर्मिती व्यवसायाला आधुनिक काळात टिकवून ठेवत मेहनत, सातत्य आणि व्यावसायिक निष्ठेच्या जोरावर त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पारंपरिक व्यवसायातून उद्योजकतेचा प्रवास यशस्वीपणे सुरू ठेवत त्यांनी मिळविलेला हा सन्मान विशेष महत्त्वाचा ठरला आहे.
पुरस्काराचे स्वरूप आणि निवडीमागील भूमिका
R.P. Foundation, GSK Film Production आणि स्वामी समर्थ क्रिएशन, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कला, साहित्य, समाजसेवा, उद्योग तसेच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा आणि प्रेरणादायी योगदानाचा गौरव करण्यासाठी या पुरस्कारांची निवड करण्यात येते.
प्रकाश मऱ्याप्पा कुंभार यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याचे अधिकृत निवडपत्र त्यांना प्रदान करण्यात आले होते. निवडपत्रानुसार त्यांना ‘महाराष्ट्र उद्योग सेवा भूषण पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले. उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, व्यावसायिक योगदान आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला.
मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण
शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बेळगाव येथील चन्नम्मा सर्कल परिसरातील कन्नड साहित्य भवन येथे ‘कला शिखर परिषद व गौरव सोहळा २०२६’ उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला बेळगावच्या महापौर श्रीमती प्रीती विनायक कामकर आणि उपमहापौर श्री. हनुमंत कोंगाळी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच ज्येष्ठ अभिनेत्री, नाट्यकर्मी व गायिका मीरा आजगांवकर, एंजल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा मीनाताई बेनके, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनुपमा धाकोजी, कलाकार व उद्योजक पांडुरंग मजुकर, समृद्धी पब्लिकेशनचे संचालक व स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. बी. एन. खरात, तसेच दिग्दर्शक व लेखक गजेंद्र कोठावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला गर्लगुंजी गावातील प्रतिष्ठित नागरिक व मार्केटिंग सोसायटीचे माजी चेअरमन गोपाळराव पाटील, ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष हनुमंत मेलगे, माजी ग्रामपंचायत सदस्य शशिकला कुंभार, मनोहर कुंभार (गोवा), रोहन कुंभार, कृष्णा गंगाराम कुंभार यांच्यासह प्रकाश कुंभार यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
गर्लगुंजीसारख्या ग्रामीण भागातून पारंपरिक विटा निर्मिती व्यवसायाची अनेक पिढ्यांची परंपरा जपत उद्योग क्षेत्रात आपले स्थान निर्माण करणाऱ्या प्रकाश कुंभार यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे गर्लगुंजी गावासह संपूर्ण खानापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.