Home » खानापूरच्या ताराराणी महाविद्यालयातील कबड्डीपटूंना ‘खानापूर फिटनेस जिम’कडून मस्क्युलर ट्रेनिंगची अनोखी भेट!

खानापूरच्या ताराराणी महाविद्यालयातील कबड्डीपटूंना ‘खानापूर फिटनेस जिम’कडून मस्क्युलर ट्रेनिंगची अनोखी भेट!

file_00000000bfe08211a875054bab45e289

खानापूरच्या ताराराणी महाविद्यालयातील कबड्डीपटूंना ‘खानापूर फिटनेस जिम’कडून मस्क्युलर ट्रेनिंगची अनोखी भेट!

राष्ट्रीय स्तरावरील बॉडीबिल्डर नितीन राजाराम पाटील यांचा स्तुत्य उपक्रम; पाच विद्यार्थिनींना मिळणार मोफत स्नायू बळकटीकरण प्रशिक्षण!

खानापूर : ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी खानापूर फिटनेस जिमचे मालक व राष्ट्रीय स्तरावरील बॉडीबिल्डर नितीन राजाराम पाटील यांनी एक प्रेरणादायी पुढाकार घेतला आहे. मराठा मंडळ संचलित म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या कबड्डी संघातील पाच गुणवंत विद्यार्थिनींना ते विनामोबदला मस्क्युलर ट्रेनिंग अर्थात स्नायू बळकटीकरणाचे विशेष प्रशिक्षण देणार आहेत. या उपक्रमाचा प्रारंभ आजपासून करण्यात आला.

नितीन पाटील यांनी बॉडीबिल्डिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून, ज्युनिअर मिस्टर इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला आहे. तसेच राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले असून, २०२१ मध्ये कर्नाटक राज्याचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या या अनुभवाचा लाभ आता ग्रामीण भागातील होतकरू कबड्डीपटूंना मिळणार आहे.

म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाचा कबड्डी संघ तालुक्यात आघाडीवर असून, तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावरील स्पर्धांमध्ये संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. नुकत्याच झालेल्या कित्तूर उत्सवातील राणी चन्नम्मा चषकावरही या संघाने आपले नाव कोरले आहे.

या खेळाडूंची शारीरिक क्षमता आणि ताकद वाढविण्याच्या उद्देशाने नितीन पाटील यांनी पाच विद्यार्थिनींच्या प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. दररोज सकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत ते स्वतः कोणतेही शुल्क न घेता प्रशिक्षण देणार आहेत.

विशेष म्हणजे, या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थिनी दुर्गम ग्रामीण भागातून येतात. त्यांच्यात खेळाचे कौशल्य आणि जिद्द असली तरी योग्य शारीरिक प्रशिक्षणाच्या संधी मर्यादित असतात. ही बाब लक्षात घेऊन नितीन पाटील यांनी सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम हाती घेतला आहे. करंबळ येथील पाटील घराण्याचा कबड्डी खेळाचा पारंपरिक वारसा जपण्याचाही त्यामागे उद्देश आहे.

यावेळी मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू म्हणाल्या, “आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी न करता समाजातील होतकरू खेळाडूंना पुढे आणण्यासाठी करणे, हीच खरी सामाजिक जाणीव आहे. आर्थिक परिस्थिती किंवा दुर्गम भागातील वास्तव्य खेळाडूंच्या प्रगतीत अडथळा ठरू नये, या उदात्त हेतूने नितीन पाटील यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.”

या उपक्रमासाठी मराठा मंडळाचे संचालक शिवाजीराव पाटील यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद पाटील, क्रीडा प्रशिक्षक प्रशांत पांखरे तसेच प्राध्यापक वर्गाने नितीन पाटील यांच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले.

ग्रामीण भागातील मुलींच्या क्रीडा गुणवत्तेला बळ देणारा हा उपक्रम खानापूरच्या क्रीडा क्षेत्रासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.


खानापूर लाईव्ह | खानापूर तालुक्यातील ताज्या बातम्यांसाठी!

Do Share

You may have missed

error: Content is protected !!
Call Us