file_00000000fd6c820eab227ebbc8886277

शेतकऱ्यांच्या सहकार्याने मार्ग मोकळा; आमदार हलगेकर यांच्या पाठपुराव्याला यश

खानापूर : खानापूर शहरातील डिग्री कॉलेज ते करंबळ क्रॉसवरील फिश मार्केटपर्यंतचा रस्ता तयार करण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि खानापूरचे आमदार श्री. विठ्ठलराव हलगेकर यांच्या मध्यस्थीने, तसेच स्थानिक शेतकऱ्यांच्या सहकार्याने या रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे.

बैठकीनंतर रस्ता निर्मितीचा मार्ग मोकळा

या रस्त्याच्या कामासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात सविस्तर बैठक पार पडली होती. बैठकीत रस्ता निर्मितीसाठी योग्य मार्ग काढण्याबाबत चर्चा करण्यात आली. कागदपत्रांची पूर्तता तातडीने न झाल्यामुळे काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.

मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन, “तुम्हाला योग्य न्याय मिळवून दिला जाईल, तुम्ही रस्ता करण्यासाठी प्रशासनाला परवानगी द्यावी,” असे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर आणि आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहमती दर्शवली.

पीडब्ल्यूडीकडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात

शेतकऱ्यांच्या सकारात्मक भूमिकेनंतर पीडब्ल्यूडी (P.W.D.) खाते आणि कंत्राटदाराच्या वतीने डिग्री कॉलेज ते करंबळ क्रॉस फिश मार्केटजवळील रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. रस्त्याचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी जेसीबी आणि इतर यंत्रसामग्री तातडीने कामाच्या ठिकाणी दाखल करण्यात आली असून, प्रत्यक्ष कामाला गती देण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांचा समन्वय; शेतकऱ्यांचे सहकार्य

या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पीडब्ल्यूडी अधिकारी, खानापूर तालुका सर्वेक्षण अधिकारी एम. एस. पाटील, तसेच स्थानिक शेतकरी राहूल सावंत व इतर शेतकरी बंधू यांनी महत्त्वाची समन्वयाची भूमिका बजावली.

प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे नागरिकांचा व वाहनचालकांचा जिव्हाळ्याचा हा महत्त्वाचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आला आहे.

आमदार हलगेकर यांचे शेतकऱ्यांना आभार

रस्ता निर्माण कार्याला ग्रीन सिग्नल मिळाल्यामुळे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी या कामात सहकार्य करणाऱ्या सर्व खानापूरच्या शेतकरी बंधूंचे मनापासून आभार मानले आहेत. रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा, यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही सुरू केली असून, नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

खानापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा रस्ता आता प्रत्यक्षात आकार घेत असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.


खानापूर लाईव्ह
विश्वसनीय आणि वेगवान स्थानिक बातम्या
संपादक : पिराजी कुऱ्हाडे

Do Share
error: Content is protected !!
Call Us