IMG_20260816_135145

जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट; भिडे गुरुजींना दिली घटनेची माहिती — आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी!

सांगली : कुपवाड येथे हेब्बाळ (ता. खानापूर) येथील केसरीकर दाम्पत्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव पीपल्स लोकसेवा फाउंडेशन, पुणे (BPL Foundation) च्या वतीने दुर्दैवी केसरीकर कुटुंबाला न्याय मिळावा, दोषीवर कठोरात कठोर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला संरक्षण द्यावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली.

या संदर्भात फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषी व्यक्तीवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेऊन प्रकरणाची माहिती देण्यात आली.

यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक भिडे गुरुजी यांचीही भेट घेऊन कुपवाड येथील घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली. बेळगाव सीमा भागातील अनेक नागरिक रोजगार व रोजंदारीसाठी महाराष्ट्रातील विविध भागात वास्तव्यास आहेत. अशा नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, त्यांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी फाउंडेशनने केली.

दोषीला कठोर शिक्षा द्या

या घटनेतील माथेफिरू प्रवृत्तीच्या व्यक्तीवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. समाजात दहशत निर्माण करणाऱ्या अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी दोषीला कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली. “दोषीला तडीपार करावे आणि कायद्यानुसार फाशीची शिक्षा मिळण्यासाठी कठोर कारवाई करावी,” अशी संतप्त मागणीही यावेळी करण्यात आली.

केसरेकर कुटुंबीयांचे सांत्वन

फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केसरीकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या हल्ल्यात मनीषा केसरेकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्यांना न्याय मिळावा यासाठी प्रशासनाने कोणतीही दिरंगाई करू नये, अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, गंभीर जखमी मोहन केसरेकर यांच्यावर उपचार सुरू असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावेत तसेच त्यांच्या उपचारासाठी आवश्यक ती शासकीय मदत मिळावी, अशी मागणीही फाउंडेशनने केली.

लहान मुलांच्या सुरक्षेची मागणी

केसरीकर कुटुंबातील लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर असून, त्यांच्या संरक्षणासाठी प्रशासनाने तातडीने आवश्यक सुरक्षा व्यवस्था करावी. पीडित कुटुंबाला आर्थिक व शासकीय मदत मिळवून देण्याबरोबरच त्यांना न्याय मिळेपर्यंत प्रशासनाने या प्रकरणाचा पाठपुरावा करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

“मनीषा केसरीकर यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि मोहन केसरेकर यांचे प्राण वाचविण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न करावेत,” अशी भावना फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

या वेळी बीपीएल फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप घाडी, माजी अध्यक्ष दत्ताराम भेकणे, सचिव अमोल हांगीरकर, देवेंद्र हांगीरकर, शेखर देवलतकर, नारायण हांगीरकर आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Do Share
error: Content is protected !!
Call Us