file_000000006b3881faa0fab500020dc191

खानापूर :

विशेष वृत्त : प्रसाद पाटील, (गर्लगुंजी )

राज्य आणि देशभर फिरताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली—उद्योजकता ही कोणत्याही एका राज्याची, जिल्ह्याची किंवा समाजाची मक्तेदारी नाही. संधी, जिद्द आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर कोणताही तरुण यशस्वी उद्योजक होऊ शकतो.

या तुलनेत पाहिले तर खानापूर तालुक्यातील युवक अत्यंत बुद्धिमान, मेहनती आणि सक्षम असूनही जागतिक स्पर्धेत मागे पडलेले दिसतात. यामागे अनेक कारणे आहेत. सीमाभाग म्हणून झालेले दुर्लक्ष, औद्योगिक विकासाचा अभाव, राजकीय अस्थिरता, जिल्ह्यात येणारे उद्योग इतर शहरांकडे वळणे, तसेच समाजातील रूढी-परंपरा आणि जातीय चौकटी यामुळे अनेक तरुणांच्या स्वप्नांना योग्य दिशा मिळत नाही.

आज आपल्या तालुक्याला सर्वात जास्त गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची, सकारात्मक विचारांची आणि उद्योजकतेची प्रेरणा देणाऱ्या वातावरणाची. पालकांनीही मुलांच्या करिअरबाबत केवळ नोकरीचा विचार न करता व्यवसाय आणि उद्योग यांचाही गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे.

आज सरकारकडे अनेक योजना, बँकांकडे कर्ज सुविधा, कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आणि स्टार्टअपला प्रोत्साहन देणाऱ्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे तरुणांनी शिक्षण, अनुभव आणि सरकारी योजनांचा योग्य उपयोग करून स्वतःचे उद्योग उभारावेत. वडिलोपार्जित व्यवसाय आधुनिक पद्धतीने वाढवावेत आणि शेतीला पूरक उद्योग सुरू करावेत.

दरवर्षी खानापूर तालुक्यातील शेकडो युवक रोजगारासाठी गोवा, महाराष्ट्र, पुणे, बेंगळुरू, चेन्नई अशा शहरांकडे स्थलांतर करतात. काही शिक्षक होतात, काही सैन्यात जातात, काही अभियंते किंवा डॉक्टर बनून शहरात स्थायिक होतात. मात्र आपल्या गावात राहून रोजगार निर्माण करणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. ही परिस्थिती बदलली पाहिजे.

खानापूर हा निसर्गसंपन्न, सुपीक जमीन, भरपूर पाऊस, जंगल आणि जैवविविधता लाभलेला तालुका आहे. येथे कृषी व कृषीपूरक उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत.

संभाव्य उद्योग क्षेत्रे:

  • दुग्ध व्यवसाय व दुग्धजन्य पदार्थ निर्मिती
  • कुक्कुटपालन, अंडी उत्पादन
  • शेळी, डुक्कर, बदक व मत्स्यपालन
  • गांडूळ खत आणि सेंद्रिय खत निर्मिती
  • सेंद्रिय भाजीपाला, फळे व धान्य उत्पादन
  • प्लांट टिश्यू कल्चरद्वारे उच्च प्रतीची रोपे
  • मशरूम (कॉर्डिसेप्ससह) उत्पादन
  • मधमाशी पालन
  • काजू प्रक्रिया व पॅकेजिंग
  • काजू फळ प्रक्रिया उद्योग
  • औषधी वनस्पतींची लागवड व अर्क निर्मिती
  • सेंद्रिय गूळ, गूळ पावडर व इथेनॉल उद्योग
  • भात प्रक्रिया व स्वतःचा तांदूळ ब्रँड
  • केळी, फणस, बटाटा, चिणा यापासून प्रक्रिया उद्योग
  • शेंगदाणा तेल व खाद्यपदार्थ निर्मिती
  • ॲग्रो टुरिझम आणि इको-टुरिझम

यातील अनेक उद्योग कमी भांडवलात सुरू होऊ शकतात. आवश्यक ते परवाने, प्रशिक्षण आणि बाजारपेठेची माहिती घेतल्यास हे उद्योग रोजगाराचे मोठे साधन ठरू शकतात.

यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या PMEGP, PMMY (मुद्रा), Startup India, Stand-Up India, PMKVY, MSME योजना, CMEGP, उद्योगिनी योजना, Karnataka Acceleration Network (KAN), Single Window System, Gokul Mission, National Livestock Mission (NLM) यांसारख्या योजनांचा लाभ घेता येतो.

आजची गरज केवळ सरकारी नोकरी शोधण्याची नाही, तर स्वतः उद्योग उभा करून इतरांना रोजगार देण्याची आहे.

जर आपण आपल्या नैसर्गिक संपत्तीचा, शेतीचा, स्थानिक उत्पादनांचा आणि सरकारी योजनांचा योग्य अभ्यास करून नियोजन केले, तर युवकांचे गोवा, महाराष्ट्र आणि इतर राज्यांकडे होणारे स्थलांतर मोठ्या प्रमाणात कमी होईल.

आपला खानापूर हा नोकरी मागणारा तालुका नव्हे, तर नोकऱ्या देणारा तालुका बनू शकतो.

यासाठी प्रत्येक तरुणाशी संवाद साधणे, त्यांच्यातील न्यूनगंड दूर करणे, उद्योजकतेचा आत्मविश्वास निर्माण करणे आणि सकारात्मक विचार रुजवणे आवश्यक आहे.

“Our Nature is Our Future” या विचाराने आपण निसर्ग, शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घातली, तर खानापूर तालुका आर्थिकदृष्ट्या सक्षम, स्वावलंबी आणि समृद्ध होईल.

युवकांनी हा विचार वाचावा, समजून घ्यावा आणि स्वतःच्या भविष्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग करावा.

– प्रसाद विठ्ठलराव पाटील
गर्लगुंजी, ता. खानापूर

Do Share
error: Content is protected !!
Call Us