खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस म्हणतोय : राऊडी शिटर आणि पोलिसांची अभद्र युती; खानापूर ब्लॉक काँग्रेसचा तहसीलदारांना निवेदन !
हिंदुत्ववादी संघटना म्हणतात.. हिंदुत्ववादी नेते पंडित ओगले हे नेहमी शांततेचे प्रतिक! तहसीलदारांना निवेदन..
खानापूर: लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे निवेदन…. राउडी शिटर वरून आरोप
खानापूर तालुक्यात सध्या पोलीस प्रशासन आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची (राऊडी शिटर) अभद्र युती पाहायला मिळत असून, हे लोकशाहीसाठी घातक आहे, असा गंभीर आरोप खानापूर ब्लॉक काँग्रेसने केला आहे. या संदर्भात आज तहसीलदार (तालुका दंडाधिकारी) यांना निवेदन देऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. सदर निवेदन देताना खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी, महंतेश राऊत, सुरेश जाधव, सूर्यकांत कुलकर्णी, महादेव कोळी, लक्ष्मण मादार यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते
कोणाचे ‘ग्लोरीफिकेशन’ करताय? – ॲड. घाडी
निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना खानापूर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. घाडी यांनी मत मांडले. ते म्हणाले, “तालुक्यातील जनतेने कोणाचे विचार ऐकावेत याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. आपण विचारवंत, शिक्षक, वारकरी आणि समाजप्रबोधनकारांना व्यासपीठावर बोलवायचे की राऊडी शिटरना? समाजाचे प्रबोधन करण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांचा वापर होणे दुर्दैवी आहे. तहसीलदार हे तालुक्याचे दंडाधिकारी आहेत, त्यांनी अशा लोकांचे ‘ग्लोरीफिकेशन’ (उदो उदो) होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे.”
संविधान पायदळी तुडवण्याचा प्रकार
यावेळी माजी नगरसेवक, दलित नेते लक्ष्मण मादार यांनी पोलीस प्रशासनावर घणाघाती टीका केली. पोलीस प्रशासन जे काही करत आहे, ते बाबासाहेबांचे संविधान पायदळी तुडवण्यासारखे आहे, असे त्यांनी नमूद केले. तर महांतेश राऊत यांनी सांगितले की, पोलीस प्रशासन नेमके कोणाला मोठे करत आहे, याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे.
गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार. काँग्रेस
“जग कुठे चालले आहे आणि आपण राऊडी शिटरचे विचार ऐकण्यात गुंग आहोत, हे चित्र क्लेशदायक आहे,” अशी खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. बुद्धीजीवी लोक आणि वारकरी मंडळींनी या विषयावर विचार करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. राऊडी शिटर आणि पोलीस यांची ही युती लोकशाही मार्गाने मोडल्याशिवाय काँग्रेस गप्प बसणार नाही. या प्रकरणातील दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी राज्याच्या गृहमंत्र्यांकडे तक्रार करून पाठपुरावा केला जाईल, असा इशारा यावेळी खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.
हिंदुत्ववादी संघटनांचे पंडित ओगले समर्थनार्थ तहसीलदारांना निवेदन!
गेल्या काही दिवसांपासून श्री. पंडित प्रकाश ओगले यांच्यावर होत असलेले आरोप तथ्यहीन आणि राजकीय हेतूने प्रेरित असून, खानापूर तालुक्यातील शांतता व सुव्यवस्था राखण्यात त्यांचा नेहमीच मोठा वाटा राहिला आहे, असे स्पष्टीकरण काल दि. १५-०४-२०२६ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आले. काही प्रसारमाध्यमे आणि राजकीय पक्षांकडून त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा उल्लेख करून पोलीस ठाण्यातील उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, त्या पार्श्वभूमीवर ही बाजू मांडण्यात आली. खानापूर शांततेत व गुण्यागोविंदाने नांदत असताना ब्लॉक काँग्रेसच्या वतीने राऊडी शीटर च्या नावे पंडित ओगले यांना टार्गेट करून पुन्हा राजकीय अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे चुकीचे आहे पंडित ओगले यांनी गेल्या काही वर्षात समाजाला संघटित व हिंदुत्ववादी युवकांना प्रोत्साहन व प्रेरणा देण्याचे काम केले आहे असे असताना ब्लॉक काँग्रेसच्या राऊडी सीटरच्या नावे अप्रत्यक्षरीत्या पंडित ओगले यांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप खानापूर तालुक्यातील विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने तहसीलदारांना एका निवेदनाद्वारे करण्यात आला. यावेळी भाजपच्या जिल्हा महिला सचिव धनश्री सरदेसाई, भाजपचे युवा नेते किशोर हेबाळकर, दीपक वाळवे, आदींनी खानापूर तहसीलदारांना निवेदन दिले तर काही हिंदुत्ववादी संघटनेने बेळगावचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना एक निवेदन सादर केले. यावेळी भाजप नेते संजय कुबल, प्रकाश देशपांडे, माजी नगरसेवक नारायण ओगले, गुंडू तोपिनकट्टी, वसंत देसाई अपय्या कोडोळी यासह अनेक जण उपस्थित होते.
शांतता समितीत सक्रीय सहभाग
पंडित ओगले हे गेल्या अनेक वर्षांपासून खानापूर येथील सार्वजनिक ‘श्री गणेशोत्सव महामंडळा’चे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. या महामंडळांतर्गत सुमारे १७ गणेशोत्सव मंडळे कार्यरत आहेत. गणेशोत्सवादरम्यान शहरात कोणत्याही प्रकारचा शांततेचा भंग होऊ नये आणि पोलीस प्रशासनाला योग्य सहकार्य मिळावे, यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व मंडळांनी आजवर शांततेत उत्सव साजरे केले आहेत.
शिवजयंती उत्सवाचे नियोजन
केवळ गणेशोत्सवच नव्हे, तर ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती’चे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. शिवजयंतीनिमित्त निघणाऱ्या भव्य चित्ररथ मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या १० गटांचे नियोजन आणि मिरवणूक शांततेत पार पाडण्यात ओगले यांचा पुढाकार असतो. तालुक्यात धार्मिक आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी नेहमीच पोलीस विभागाला सहकार्य केले आहे.
राजकीय आकसापोटी बदनामीचा प्रयत्न
पंडित ओगले यांच्यावर असलेल्या जुन्या तक्रारींबाबत स्पष्टीकरण देताना सांगण्यात आले की, सुमारे १५ वर्षांपूर्वी केवळ राजकीय कारणास्तव त्यांच्यावर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आरोप करून तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र, आजवरची त्यांची सामाजिक कारकीर्द पाहता, त्यांनी नेहमीच शांततेचा पुरस्कार केला आहे.
प्रशासनाला विनंती
“आगामी काळात खानापूर तालुक्यात जेव्हा कधी शांतता सभांचे आयोजन होईल, तेव्हा आमच्या समितीकडून श्री. पंडित प्रकाश ओगले यांना प्रतिनिधी म्हणून पाठवण्यात येईल. त्यामुळे पोलीस प्रशासनाने आणि संबंधित विभागाने कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता, वस्तुस्थिती विचारात घेऊन योग्य तो न्याय द्यावा,” अशी विनंती या पत्रकार परिषदेद्वारे करण्यात आली आहे.