फोटो : खानापूर : पत्रकारांना माहिती देताना सुरेश जाधव, ॲड ईश्वर घाडी, महादेव कोळी, महांतेश राऊत, सावित्री मादार, दीपा पाटील, लक्ष्मण मादार व इतर.
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
तालुक्यात भाजपची सत्ता येऊन दोन वर्षे पूर्ण झाली. तरीही विकास कामांच्या बाबतीत सर्वच स्तरावर सामसूम आहे. विकास कामांच्या मंजुरीसाठी सरकारकडे पाठपुरावा करावा लागतो. त्यात सातत्य ठेवावे लागते. जनतेला न्याय देणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. या कामात भाजपचे आमदार-खासदार सपशेल अपयशी ठरले आहेत. या अपयशाचे खापर त्यांनी काँग्रेस नेत्यांवर फोडू नये. असा टोला ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड ईश्वर घाडी यांनी लगावला.
ब्लॉक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काल पत्रकार परिषदेत प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा वचक राहिला नसल्याचे सांगत सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये अनागोंदी माजली असल्याचा आरोप केला. नुकताच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आमदारांनी विकास कामांमध्ये काँग्रेसचे नेते आडकाठी करत असल्याचा आरोप केला होता. यामध्ये कोणतेही तथ्य नसून तो काँग्रेस पक्षाची बदनामी करण्यासाठी करण्यात आल्याचा दावा पत्रकार परिषदेत करण्यात आला.
काँग्रेस नेते सुरेश जाधव म्हणाले, एसएसडीपी अनुदानातून माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर यांनी आपल्या आमदारकीच्या काळात लिंगनमठ आणि हलशी-नागरगाळी रस्त्यांसाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ठेकेदारही मिळाला होता. त्यानंतर विद्यमान लोकप्रतिनिधींकडून कामाच्या कार्यवाहीकडे दुर्लक्ष झाले. आजतागायत दोन्ही रस्त्यांचे काम सुरू झालेले नाही. परिणामी जनतेचे हाल होत आहेत. निवडून आल्यानंतर वाळू व्यवसायिकांची लूट पूर्णपणे थांबविण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्याची पूर्तता झालेली नाही. स्थानिक कंत्राटदारांनाच सरकारी कामांचे ठेके देण्याचे आश्वासनही हवेत विरले आहे.
आमदारांच्या स्वीय सहाय्यकावर भाजपच्याच कार्यकर्त्यांनी 25 टक्के कमिशन मागितल्याचा आरोप केला होता. स्वीय सहाय्यकाला कामावरून काढून गप्प न बसता त्याच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी होणे आवश्यक होते. ते पुढे म्हणाले,
डीसीसी बँक निवडणूक आणि मलप्रभा साखर कारखान्याच्या निवडणुकीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आमदार मदत घेऊ शकतात. त्याच धर्तीवर विकास कामांच्या बाबतीतही त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांचे सहकार्य घ्यावे. आम्हीही मतभेद बाजूला ठेवून विकास कामांसाठी आमदारांना कधीही मदत करण्यास तयार आहोत.
केपीसीसी सदस्य महादेव कोळी म्हणाले, डॉ. निंबाळकर यांच्या आमदारकीच्या काळात राज्यात भाजपची सत्ता होती. तरीही त्यांनी कोट्यावधीचा निधी आणून विकास कामे राबविली. आमदार हलगेकर यांनी काँग्रेसवर तोंडसुख न घेता कामातून उत्तर देण्याचे आव्हान दिले. शहर काँग्रेसचे अध्यक्ष महांतेश राऊत यांनी आमदारांच्या वक्तव्याचा निषेध करून आपल्या अकार्यक्षमतेचे खापर त्यांनी काँग्रेसवर फोडू नये असे सांगितले. यावेळी महिला अध्यक्ष सावित्री मादार, दीपा पाटील, नगरसेवक लक्ष्मण मादार, पंचहमी कमिटीचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी, तोईद चांदखन्नवर, इसाखान पठाण, राजू सोनटक्के, रायाप्पा बळगप्पनवर, भरतेश तोरोजी, जोतिबा शिवणगेकर, देमान्ना बसरीकट्टी उपस्थित होते.
गेल्या दोन वर्षात एकदाही केडीपी बैठक झालेली नाही. कामचुकारपणाचा जाब विचारणारे कोणीच नसल्याने सरकारी कार्यालयांमध्ये जनतेची लूट सुरू आहे. बोगस खरेदी पत्रे करून गोरगरिबांच्या जमिनी लाटल्या जात आहेत. तहसीलदार कार्यालयामध्ये सायंकाळी सहानंतर कार्यालयात बसून राजरोसपणे बेकायदेशीर कामे केली जात आहेत. अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधींचा वचक राहिला नसल्यानेच लोकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. काँग्रेस पक्ष लवकरच या सर्व प्रकरणांचा पुराव्यांशी भांडाफोड केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुरेश जाधव यांनी दिला.