
खानापूर लाईव्ह न्यूज /प्रतिनिधी :
गोवा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभात ताराराणी पीयूसी कॉलेज, खानापूर (जि. बेळगाव, कर्नाटका) येथील प्राध्यापक श्री. एन. ए. पाटील यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार वितरण सोहळा दि. 27/4/2025 रोजी रवींद्र भवन गोवा सांकळी येथे आयोजित करण्यात आला होता. या समारंभात कर्नाटका, दिल्ली, महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या पाच राज्यांतील विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करण्यात आला. या नामवंत सोहळ्यात श्री.एन.ए.पाटील यांनी आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे राष्ट्रीय पातळीवर स्वतःचा ठसा उमठवला.
श्री. एन.ए.पाटील सरांनी शिक्षण क्षेत्रात १२ वर्षे प्राचार्य, १२ वर्षे उपप्राचार्य आणि ५ वर्षे प्राध्यापक म्हणून शिक्षण क्षेत्रात समर्पित सेवा दिली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व व्यक्तिमत्व विकास साधला आहे. विद्यार्थ्यांमध्ये केवळ शैक्षणिक प्रगती नव्हे तर नैतिक मूल्ये, चारित्र्य विकास व नेतृत्वगुण जोपासण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. अध्यापनात नवनवीन पद्धतींचा वापर आणि सामाजिक भान निर्माण करण्याची त्यांची विशिष्ट शैली यामुळे त्यांचे कार्य अत्यंत प्रभावी ठरले आहे. पुरस्कार सोहळ्यात श्री.एन.ए.पाटील यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान प्रेरणादायी ठरत असून, नव्या पिढीतील शिक्षकांसाठी ते एक आदर्श ठरले आहेत.