
खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी –
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या 370 कलमावर निर्णय घेतला गेला.मात्र गेली ६८ वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेला बेळगाव महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्याचे काम सरकारला करता आलेले नाही. देशातील काही प्रश्न जनतेला झुंजवण्यासाठीच सोडविले जात नाहीत, असे परखड मत गोव्याचे जेष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे यांनी गुरुवारी खानापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात बोलताना केले.
येथील शिवस्मारक भवनात राज्य मराठी विकास संस्था मुंबई व मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान खानापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने मराठी भाषा गौरव गौरव दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रभाकर ढगे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर यांच्यासह आमदार विठ्ठल हलगेकर, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते विलास बेळगावकर,खानापूर तालुका भाजपचे माजी अध्यक्ष संजय कुबल,ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील, राजाराम देसाई, खानापूर म.ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, खानापूर को po बँकेचे संचालक बाळासाहेब शेलार,माजी जिल्हा पंचायत सदस्य पुंडलिक कारलगेकर यांच्यासह बहुसंख्य मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

मराठी माणसाने कर्तबगारीत ठसा उमटवावा
या कार्यक्रमात पुढे बोलताना प्रभाकर ढगे म्हणाले, बेळगाव सीमा भागातील आणि गोव्यातील मराठी भाषिकांचे दुःख सारखेच आहे. गेले 68 वर्षे बेळगाव सीमा भागातील मराठी जनता तडफडतेने आणि जिद्दीने आपला लढा देत आहे. त्याचप्रमाणे 1987 मध्ये दोन जमातीमधील भांडणात मराठी भाषेला डावलून कोकणी भाषेला गोव्यात राज्यभाषेचा दर्जा देण्यात आला. गोव्यातील मराठी भाषा परकियांनाही संपवता आली नव्हती.मात्र गोवा आणि बेळगाव सीमा भागात मराठी संवर्धनात महाराष्ट्राची भूमिका कुचकामी ठरली. किंबहुना महाराष्ट्र सरकार बृहनमहाराष्ट्रातील मराठी जनतेला गृहीतच धरत नाही. यामुळेच दोन वेळा महाराष्ट्राला मिळणारा पंतप्रधान पदाचा मान गमवावा लागला आहे महाराष्ट्र सरकार जोपर्यंत बृहन महाराष्ट्रातील मराठी भाषिकांचा प्रश्नांची सोडवणे करणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करू शकणार नाही असेही ढगे यांनी स्पष्ट केले.

पहिले संगीत नाटक, पहिली कादंबरी,पहिली नाट्य लेखिका गोव्यात घडली. मात्र याचा इतिहासात उल्लेख दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्यावर लिखाण होत असले तरीही, ज्यांनी स्वराज्याची संकल्पना मांडली त्या शहाजी महाराजांबद्दलच्या इतिहासाची कुणी दखलच घेत नाही. कर्तुत्ववान जिजाऊंच्या शौर्याचे कार्याचे दाखलेही दडवले गेले.शहाजी महाराजांची कर्नाटकातील कर्तबगारी आजही पुढे आलेली नाही.खरा इतिहास कळू दिला जात नाही. थोर मराठी माणसांची कर्तबगारी जोपर्यंत कळणार नाही,तोपर्यंत मराठी माणसांच्या मागण्यांना वजनच प्राप्त होणार नाही असेही ढगे यांनी सांगितले.
बेळगाव सीमा भागातील 865 गावांतील मराठी भाषिक तडफतेने या भागात मराठी भाषा आणि संस्कृती जागृत ठेवण्याचे काम करत आहेत.त्याला सरकार साथ देत नाही. बेळगाव सीमा भागातील मराठी भाषेत ज्या जिद्दीने काम करत आहेत त्याला महाराष्ट्राचे साथ ही लाभत नाही.लोकेच्छे नुसार मातृभाषा प्रदान करण्यातही सरकार उदासीन का? याचा प्रत्येकाने गंभीर विचार करावा.अशावेळी जे काम सरकारला करता येणार नाही, त्यासाठी सर्वांनी मिळून भाषा संस्कृती टिकून ठेवण्यासाठी एकत्रपणे एकदिलाने काम करणे आवश्यक आहे. या भागातील शाळा सुरू राहण्यासाठी पालक शिक्षकांनीच जबाबदारी स्वीकारावी लागेल. माय मराठीच्या लढ्यात अशी अनेक धुरिणांनी सर्वांना एकत्र जोडण्याचे प्रयत्न केले.या कामात अपशकुन आणणारे निर्माण झाले. अशा अघोरीं प्रवृत्तीच्या अपशकून्यांच्या कारवाया हाणून पाडाव्या लागतील.सांस्कृतिक मूल्य टिकवण्यासाठी मातृभाषा आवश्यक आहे.भाषा आमचे अस्तित्व आहे.तंत्रज्ञानातून हे साध्य होणार नाही. बेळगाव सीमा भागातील मराठी जनतेने मराठी भाषा आणि संस्कृतीचे चालविलेले कार्य अभिमानास्पद असल्याचेही ढगे यांनी सांगितले.
मातृभाषेचा प्रत्येकाला सार्थ अभिमान! आमदार विठ्ठल हलगेकर!
भाषा ही प्रत्येकाला जन्मजात नसते, बोलीभाषा ही माणसाच्या नसानसात रुचलेली भाषा असते. भाषेचे बोल ही जन्मदाती आई असते म्हणून भाषेला मातृभाषा असे म्हटले जाते. मराठी भाषा ही सामर्थ्याचे, व वैभवाचे तो तर आहे म्हणून जगाच्या पाठीवर या भाषेने आज नाव कमावले आहे. अनेक संत साहित्याने या भाषेला पूर्वा कालापासून अविभाज भाषेचा रंग दिला. आज भारत सरकारने या भाषेला अभिजात भाषा असल्याचा गौरव देऊन मराठी माणसाचा स्वाभिमान उंचावला असल्याचे उद्गार त्यांनी व्यक्त केले.
यावेळी राजाराम देसाई, मुरलीधर पाटील, पुंडलिक कारलगेकर, संजय कुबल,आबासाहेब दळवी, गोपाळ देसाई यांनीही समायोजित विचार मांडले. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन आणि कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रभाकर ढगे यांच्यासह अन्य मान्यवरांचा ही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,स्वागत प्रास्ताविक,वासुदेव चौगुले यांनी केले. या कार्यक्रमाला खानापूर शहर आणि तालुक्यातील मराठी भाषिक, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.