
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : प्राथमिक शाळेतील विद्यार्थी घडले पाहिजेत, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कलागुणांना वाव दिली तर विद्यार्थी भविष्यात आपल्या शारीरिक आरोग्यावर उच्च शिक्षणासाठी नेहमी प्रयत्नशील राहतील यासाठी प्राथमिक शाळेत बालवयातच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्राधान्य देऊन वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षा, खेळातील वाचनातील तसेच इतर भौतिक खेळाच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचे काम केले पाहिजे. तरच आजचा विद्यार्थी भविष्यात एक आदर्श विद्यार्थी व गुणवान विद्यार्थी घडेल असे विचार जीएसएस कॉलेजचे प्रा भरत तोपिनकट्टी यांनी व्यक्त केले. प्रति वर्षाप्रमाणे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे अवचित साधून आपल्या मातोश्री कै. आनंदीबाई तोपिनकट्टी यांच्या स्मरणार्थ आपल्या मूळ गावातील प्राथमिक शाळेत दिल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख अतिथी या नात्याने बोलत होते.
निडगल (ता खानापूर) येथील कै आनंदीबाई तोपिनकट्टी यांच्या स्मरणार्थ त्याचे चिरंजीव प्रा. भरत तोपिनकट्टी यांनी मराठी हायर प्राथमिक शाळा, निडगल येथे वार्षिक शैक्षणिक स्पर्धा पारितोषिक समारंभ 26 जानेवारी रोजी पार पडला. शालेय विध्यार्थ्यांचा शैक्षणिक व बौद्धिक विकास व्हावा यासाठी वर्षभर पाहिली ते सातवी च्या प्रत्येक वर्गासाठी प्रत्येक शनिवारी वाचन, गायन, भाषण, चित्रकला, कागदी वस्तू निर्माण, माती हस्तकला, भाषण, हस्ताक्षर आदी स्पर्धा आयोजिल्या जातात. वर्षभर चांगली हजेरी व स्वच्छ राहण्याची सुद्धा स्पर्धा आयोजिली जाते. या सर्व स्पर्धाची बक्षीसे प्रा. भरत तोपिनकट्टी आपल्या मातोश्री कै. आनंदीबाई यांच्या स्मरणार्थ दरवर्षी प्रायोजित करतात. दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा लिहिण्यासाठी पॅड, वह्या, पेन्सिल बॉक्स, स्केच पेन बॉक्स, रंग पेटी व इतर शालोपयोगी वस्तू रुपात एकूण 234 पारितोषिकांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ओ. एम. मादार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष श्री गंगाराम लोहार हे अध्यक्ष स्थानी होते. या वेळी ज्येष्ठ निवृत्त शिक्षक महादेव कदम, ग्रामपंचायत सदस्य श्री प्रवीण पाटील, शांताराम कदम, दिगंबर देसाई, जयदेव देसाई, अशोक कदम, श्रीमती रेश्मा कदम, तसेच शाळेतील शिक्षक श्री. खांबले, श्री. कंबळीमठ, सौ. जांगळे, आणि इतर उपस्थित होते. शाळेतील शिक्षका श्रीमती गुरव यांनी सूत्रसंचालन केले.शाळेतील शिक्षिका नांद्याळकर यांनी आभार मानले.