
खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : सध्याचे युग हे विज्ञान युग असल्याने विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयात आवड निर्माण व्हावी म्हणून शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून आवड निर्माण करण्याचे प्रयत्न काही शाळांमध्ये केले जात आहेत. विशेषतः गणित व विज्ञान अशा विषयाबद्दल जर आवड निर्माण झाली तरच विद्यार्थ्यांना तो विषय अधिक सोपा वाटू लागतो. त्यासाठी अभ्यासातील आकृत्या रोजच्या रांगोळीतून साकारणे किंवा शाळेत प्रदर्शन भरवून विज्ञान विषयातील आकृत्या रांगोळीच्या माध्यमातून साकारण्याचे कार्य किंवा विज्ञान मॉडेल प्रदर्शन भरवण्याचा उपक्रम कणकुंबी येथील श्री माऊली विद्यालयात गेल्या चार वर्षापासून सुरू आहे.

यावर्षी देखील कणकुंबीच्या श्री माऊली विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विज्ञान मॉडेल बनविण्याबरोबरच परीक्षेला उपयुक्त असलेल्या विज्ञानाच्या आकृत्या रांगोळ्यातून साकारल्या होत्या. दहावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमात असलेल्या विज्ञानाच्या आकृत्यापैकी “हृदयाची आकृती तसेच चेतन पेशी, मेंदू, फुलाचा उभा छेद,पराग कणांचे किंजलकावर,अंकुरण,जस्ताच्या कणांची रासायनिक क्रिया,पाण्याचे पृथक्करण, हायड्रामधील मुकलायन, काचेच्या चीफ मधील पृथक्करण, बहिर्वक्र व अंतर्वक्र भिंग यामधील किरणाकृती अशा जवळपास बावीस आकृत्या रांगोळीतून काढल्या होत्या.
तसेच स्नेहल नाईक व ग्रुपने विद्यालयाच्या संपूर्ण इमारतीची प्रतिकृती रांगोळीच्या माध्यमातून साकारली होती. इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी सायन्स मॉडेल तयार केले होते. त्यामध्ये मानवी श्वसन संस्था, सौरमाला, न्यूटन चक्र, वनस्पतीचे भाग, भूकंप सुचक यंत्र, सौर ऊर्जा व सेल्युलर श्वसन, जलचक्र, स्मार्ट सिटी, हवा प्रदूषण, रात्र आणि दिवस, सूर्यग्रहण व सूक्ष्मदर्शक यंत्र अशी विविध मॉडेल्स सादर केली होती.एकूण पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.सदर प्रदर्शन भरविण्यासाठी विद्यालयाचे मुख्या.एस.जी.चिगुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिथी विज्ञान शिक्षक एन.टी.हलशिकर,एस.आर.जाधव,एस.आर.देसाई व इतर शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
