काँग्रेस अध्यक्ष अॅड. घाडी : निलंबित अधिकाऱ्याचे समर्थन केल्याबद्दल टीका
khanapur: खानापूरच्या निलंबित पोलिस निरीक्षकांच्या बचावासाठी मैदानात उतरलेले भाजपचे नेते तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर मूग गिळून गप्प का बसतात, असा सवाल ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. ईश्वर घाडी यांनी भाजप नेत्यांना केला आहे.
ते म्हणाले, उत्तर परिक्षेत्राच्या पोलिस महानिरीक्षकांनी पोलिसनिरीक्षक मंजुनाथ नायक यांचे निलंबन केले आहे. तथापि कोणत्याही चौकशीपूर्वीच खानापूर भाजपच्या नेत्यांनी नायक निर्दोष असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या समर्थनासाठी तहसीलदारांमार्फत पोलिस महानिरीक्षकांना निवेदन देण्यात आले. या प्रकारामुळे भाजपने स्वतःचेच हसे करून घेतले आहे. ज्या पोलिस निरीक्षकांसाठी भाजपचे नेते मैदानातउतरले आहेत. त्याच अधिकाऱ्याच्या ठाण्यात पोलिसांनी आपल्यावर हल्ला करुन बेदम मारहाण केल्याचा आरोप भाजपचे नेते सी. टी. रवी यांनी केला आहे. त्यामुळे खरे कोण, खोटे कोण हे भाजपच्या नेत्यांनी सांगावे, असा टोला त्यांनी लगावला आहे.
एका अधिकाऱ्यासाठी एवढा जिवाचा आटापिटा केला जात आहे. पण, हत्तींकडून पिके उद्ध्वस्त होत असताना शेतकऱ्याची मदत करावी. हत्तींचा बंदोबस्त करावा, यासाठीधडपड करावी असे का वाटले नाही. असा सवालही त्यांनी केला आहे. गणेबैल टोल नाक्यावर अन्यायकारक आणि जाचक टोल आकारणी बंद करण्यासाठी अशी निवेदन देण्याची बुद्धी भाजपच्या नेत्यांना का सुचली नाही. महामार्गात जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. ती मिळावी यासाठी निवेदन देण्याची तसदी भाजपचे नेते घेतील का, असा सवाल अॅड. घाडी यांनी केला आहे.