खानापूर तालुक्यातील नायकोल येथील भारतीय सैनिक यशवंत सहदेव गावडा (वय 33) यांचे सेवेत असताना प्रदीर्घ आजारातून निधन झाले. यशवंत 2008 मध्ये मद्रास इन्फंट्री मध्ये भरती झाला होता. गेल्या 14 वर्षात त्यांनी राजस्थान, दिल्ली, जम्मू अशा अनेक ठिकाणी आपली प्रामाणिक सेवा बजावली.
एक प्रामाणिक व आदर्श सैनिक म्हणून त्याची गाव परिसरात ख्याती होती. त्याने भारतीय सेनेत असतानाही गावाकडच्या मित्र परिवारात नेहमी मिळून मिसळून राहायचा. यशवंत अलीकडेच गावाकडे सुट्टीवर आला होता. महिन्याभरापूर्वी त्याला एका आजाराने घेतले होते. पण गेल्या आठवड्यात त्या आजाराचे गंभीर स्वरूपात रूपांतर झाल्याने त्यावर निदान झाले नाही. सेवेत असतानाच त्याला दिल्ली आर आर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण उपचार झाला नसल्याने सोमवारी सकाळी 9.30 वाजता त्याचे देहावसान झाले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक चार वर्षाचा मुलगा, भाऊ, भावजय असा परिवार आहे.
दिल्ली येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये कागदपत्रे सोपस्कार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री मृतदेह विमानाने आणला जाणार आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजता नायकोल येथे त्याच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्याच्या अकस्मित निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.